वणी टाईम्स न्युज : सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत एका विशिष्ठ ठेकेदाराला कोट्यावधी रुपयांचा कंत्राट मिळवून देण्यासाठी प्रारूप निविदामध्ये खोडतोड केल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील वणी उपविभाग कार्यालयात उघडकीस आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा अंतर्गत वणी सा. बा. कार्यालयाचे प्रभारी उप अभियंता यांनीच हा कारनामा घडून आणला आहे. सदर प्रकरणाची लेखी तक्रार मुख्य अभियंता सा.बा. प्रादेशिक विभाग, अमरावती यांच्या कडे करण्यात आली असून प्रभारी उप अभियंत्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार सार्व. बांधकाम विभाग पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंता यांनी वणी उपविभाग अंतर्गत वेळाबाई मोहदा रस्ता रा. मा.-315 किमी 92/800 ते 95/500 ( वेळाबाई गाव ते आबई फाटा) ची सुधारणा करणे ता. वणी, जि. यवतमाळ या कामाची मंजुरीसाठी प्रारूप प्रस्ताव अधीक्षक अभियंता सा. बा. मंडळ यवतमाळ यांच्याकडे 5 सप्टेंबर 2024 रोजी पाठविले होते.
अधीक्षक अभियंता यवतमाळ यांनी 9 सप्टेंबर 2024 रोजी सदर कामाची मंजुरीस्तव प्रारूप निविदा प्रस्ताव (DTP) मुख्य अभियंता सा. बा. प्रादेशिक विभाग अमरावतीकडे वर्ग केला. तब्बल 500 लक्ष रुपये कामाच्या प्रारूप प्रस्ताव मध्ये निविदा धारकाकडे स्वतच्या मालकीचे ऑटोमॅटिक कॉम्प्युटर कंट्रोल ड्रममिक्स /हॉटमिक्स प्लांट 1 नग, मेकॅनिकल स्प्रेअर ( 6 मेट्रिक टन पेक्षा कमी नाही) 1 नग, हायड्रो स्टेटिक पेव्हर फिनिशर (सेंसर कंट्रोलसह) 1 नग, स्टेटिक रोड रोलर नग 1 आणि वायब्रेटरी रोलर नग 1 अशी मशिनरी असणे आवश्यक असल्याची अट समाविष्ट करण्यात आली होती.
प्रारूप प्रस्तावाचे अवलोकन करून मुख्य अभियंता यांनी सदर कामाला मंजुरी प्रदान केली. आणि खरा गेम येथून सूरु झाला. सार्व. बांधकाम उप विभाग वणीचे प्रभारी उप अभियंता सुरेश आसुटकर यांनी सा. बा. प्रादे. विभाग अमरावती कार्यालयातील निविदा लिपीक (Tender Clark) यांना हाताशी धरुन सदर प्रारूप प्रस्तावाच्या आवश्यक मशिनरीच्या कॉलममध्ये लाल रंगाच्या पेनने सहावी मशिनरी म्हणून 1 नग मोटर ग्रेडर (स्वतःचे मालकीचे) आवश्यक असल्याची अट जोडायला लावली.
वास्तविक पाहता संगणीकृत आणि मंजूर प्रस्तावमध्ये खोडतोड करण्याचा अधिकार नसताना निविदा लिपीक व प्रभारी अभियंता सुरेश आसुटकर यांनी परस्पर व्यवहार करून मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना माहिती न करता ऑनलाईन प्रक्रिया पूर्व निविदा प्रस्ताव मध्ये एका विशिष्ट कंत्राटदाराला लाभ मिळवून देण्यासाठी अतिरिक्त मशिनरीची अट जोडली.
प्रभारी अभियंता यांनी केलेल्या कारनाम्या बाबत दुसऱ्या ठेकेदारांना कुणकुण लागली. त्यामुळे त्यांनी कार्यकारी अभियंता कार्यालयातून सदर प्रारूप प्रस्तावाची नकल प्रत मागितली असता ह्या प्रकरणाचा भांडाफोड झाला. सदर प्रकरणाबाबत त्या ठेकेदारांनी मुख्य अभियंता सार्व. बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती यांच्या कडे तक्रार करून या गंभीर गुन्ह्यातील दोषी प्रभारी उप अभियंता सुरेश आसुटकर आणि प्रादे. विभाग कार्यालयातील निविदा लिपिक यांना निलंबित करण्याची मागणी केल्याची माहिती आहे.