सुशील ओझा, मुकुटबन : झरी तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत कोडपाखिंडी गावालगत जंगल परिसरात भरविण्यात आलेल्या कोंबड बाजारावर स्था.गुन्हा शाखा (LCB) पथकाने धाड टाकली. सोमवार 14 जाने. रोजी केलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी 7 जुगाऱ्यांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
झरी तालुक्यातील घनदाट जंगलात कोंबड बाजार सुरु असल्याची गोपनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली होती. माहितीवरून एलसीबी पथकाचे सपोनी अतुल मोहनकर व कर्मचाऱ्यांनी पाटण पोलीस स्टेशन हद्दीत कोडपाखिंडी गावालगत जंगलात नमूद ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी त्या ठिकाणी काही इसम कोंबड्याच्या पायाला धारदार काती बांधून त्यांची झुंजी लावून पैशाची बाजी खेळतांना आढळले.
पोलिसांनी त्या ठिकाणहून गंगाधर अय्या आत्राम (25) रा. माडवा, जिवन सुनिल मानकर (25) रा. कोडपाखिंडी, अनिल रामचंद्र पावडे (56) रा.पांढरकवडा (ल.), भीमराव धर्माजी पेंदोर (44) रा. टेंबी ता. झरी, शंकर विठ्ठल आकुलवार (30), रा. माडवा ता. झरी, शंकर सुर्यभान बोपाटे (41) रा. मार्की ता. झरी व लक्ष्मण रामा आत्राम (40) रा. माडवा ता. झरी हे इसम मोक्यावर मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.
ताब्यातील इसमांची झडतीमधुन 18 हजार 780 रुपये रोख, 4 नग लोखंडी काती व 4 कोंबडे तसेच 7 दुचाकी असा एकुण 2 लाख 25 हजार 860 रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने सर्व आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन पाटण येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ .पवन बन्सोड श्री. अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, एलसीबी प्रमूख पो.नि.आधारसिंग सोनोने पोलीस यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि संदीप पाटील, पोलीस अंमलदार योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके, अमित पोयाम यांनी पार पाडली.