वणी : स्था. गुन्हा शाखा (LCB) पथकाने सोमवार 12 फेब्रुवारी रोजी मुकुटबन रोडवरील मिलिंद गॅरेज मध्ये धाड टाकून एक धारदार तलवार जप्त केली. अवैधरीत्या घातक शस्त्र बालग्ण्यावरून गॅरेज मालक मिलिंद शंकरराव पिंपळकर (36), रा. विठ्ठलवाडी याला पोलिसांनी अटक केली आहे.
एलसीबी पथक वणी कार्यालयात हजर असताना मुकुटबन रोड वरील चारचाकी वाहन दुरुस्ती करणाऱ्या मिलिंद गॅरेजचे मालक मिलिंद पिंपळकर यांनी वाईट उद्देशाने तलवार बाळगण्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती वरून एलसीबीचे सपोनि अमोल मुडे, पीएसआय रामेश्वर कांडूरे यांनी पोलीस स्टाफसह मिलिंद गॅरेजवर धाड टाकली. गॅरेजची झडती घेतली असता एका लोखंडी रॅकच्या बाजूला कपड्यात गुंडाळून ठेवलेली 56 से.मी. लांब धारदार तलवार पोलिसांना सापडली.
गॅरेजमध्ये हजर मिलिंद पिंपळकर याला तलवारीचा परवाना व बाळगण्याचा उद्देश विचारला असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिलं नाही. त्यामुळे पोलिसांनी तलवार जप्त करून आरोपीलाअटक केली. फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सुधीर कुंजीप्रसाद पांडे यांची फिर्याद वरून आरोपी विरुध्द वणी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम 25,4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही एलसीबीचे सपोनि अमोल मुडे, पीएसआय रामेश्वर कांडूरे, योगेश डगवार, सुनील खंडागळे, निलेश निमकर, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, नरेश राऊत यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पार पाडली.