जितेंद्र कोठारी, वणी : गोडावूनच्या बाहेर झोपलेल्या चौकीदाराचा खून करून अज्ञात दरोडेखोरांनी सळाखीचे बंडल पळवून नेल्याची घटना सोमवारी सकाळी वणी यवतमाळ मार्गाव उघडकीस आली. जीवन विठ्ठल झाडे (60) रा. आष्टोना, ता. राळेगाव असे खून झालेल्या चौकीदाराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी घटनास्थळी पोहचले. घटनास्थळ पंचनामा करून चौकीदाराचे मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार वणी येथील सिमेंट व स्टीलचे व्यावसायिक योगेश ट्रेडर्सचे मालक सुरेश खिंवसरा यांचे वणी यवतमाळ मार्गावर पळसोनी फाट्याजवळ सिमेंट गोडावून आहे. राळेगाव तालुक्यातील आष्टोना येथील जीवन विठ्ठल झाडे हा मागील 10 वर्षापासून खिंवसरा यांचे सिमेंट गोदामावर चौकीदार म्हणून काम करीत होता. जीवन हा आपल्या पत्नीसह गोदाम परिसरात बांधलेल्या खोलीत राहत होता. रविवारी रात्री चौकीदार जीवन झाडे यांची पत्नी कामानिमित्त आपल्या गावाला जाऊन होती. त्यामुळे जीवन हा गोदामाबाहेर खाटावर झोपला होता.
रात्रीच्या दरम्यान चोरीच्या उद्देश्याने आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी खाटेवर झोपलेल्या जीवन झाडे याच्या डोक्यावर तसेच पाठीवर वजनदार वस्तूने प्रहार करून खून केला. त्यानंतर दरोडेखोरांनी गोदामच्या बाहेर लोखंडी साखळीने बांधून ठेवलेले सळाखीचे 240 वजनाचे 4 बंडल किमत 14 हजार वाहनात टाकून पळ काढला. दरम्यान दरोडेखोरांनी गोदाम परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोडही केली.
सोमवारी सकाळी योगेश ट्रेडर्सचा दिवाणजी नेहमीप्रमाणे गोदामावर गेला तेव्हा ही घटना उघडकीस आली. घटनेबाबत त्यांनी तत्काळ गोदाम मालक सुरेश खिंवसरा यांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वणीचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी पोलीस स्टाफसह घटनास्थळ पोहचले व घटनास्थळ पंचनामा केला. घटनेबाबत फिर्यादी सुरेश खिंवसरा यांनी वणी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. फक्त 14 हजाराच्या सळाखीसाठी चौकीदाराचा खून केल्याची घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.