वणी टाईम्स न्युज : हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सद्गुरू जगन्नाथ महाराज यांच्या नावाने देवस्थानला दान दिलेल्या जमिनीचे संस्थेच्या विश्वस्त सदस्यांनी एका खाजगी कोळसा कंपनीसोबत संगनमत करुन परस्पर विल्हेवाट लावल्याची तक्रार जिल्हाधिकारी यवतमाळ, धर्मदाय आयुक्त यवतमाळ, खनिकर्म मंत्रालय व पोलीस स्टेशन मुकुटबन येथे करण्यात आली आहे. माथार्जून येथील सामाजिक कार्यकर्ता बंडू विश्वनाथ देवाळकर यांनी गुरुवारी वणी येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत पुराव्यानिशी खुलासा केला.
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार सद्गुरू जगन्नाथ महाराजांचे परम भक्त कृष्णाजी मंदावार यांनी मौजा रुईकोट, तालुका -झरीजामणी (तत्कालीन मारेगाव तहसील) येथील आपल्या शेतजमीन पैकी गट क्रमांक 49/5 हा भूखंड जगन्नाथ महाराज हयात असताना सन 1985 मध्ये त्यांना दान स्वरूप दिला. जगन्नाथ महाराज विदेही झाल्यानंतर सद्गुरू जगन्नाथ महाराज देवस्थान, वेगांव तह. वणी या संस्थेच्या ताब्यात आहे. वणी येथील संजय रुधाजी देरकर या संस्थेचे विश्वस्त आहेत.
मुकुटबन, रूईकोट, अर्धवन, पांढरकवडा परिसरात खाजगी कोळसा खाणी अस्तित्वात आल्यानंतर परिसरात शेतजमिनीचे दर गगनाला भिडले. दरम्यान मंदावार कुटुंबीयांनी दान दिलेले भूखंड सोडून आपल्या ताब्यातील उर्वरित शेती खाजगी कोळसा कंपनी मे. बी. एस. इस्पात लिमिटेड या कंपनीला विक्री केली. जगन्नाथ महाराज देवस्थान समितीच्या ताब्यातील भूखंड गट क्रमांक 49/5 हा रस्ता लगत असल्याने कोळसा खाणीकडे जाण्यास रस्ता राहिला नाही. अश्या परिस्थितीत बी एस. इस्पात कंपनीने सदर संस्थेच्या विश्वस्त मंडळींशी संपर्क साधला.
देवस्थान संस्थेच्या विश्वस्तांनी कोळसा कंपनीला सदर जमिनीवर कोळसा उत्खनन करण्याची परवनगी दिली. त्यानंतर बी.एस. इस्पात लिमिटेड यांनी स्वतच्या मालकीच्या जमिनीला लागून असलेल्या संस्थेच्या 2.02 हे.आर.जमिनीची खरेदी न करता मागील 5 वर्षात तब्बल 50 कोटी रुपयांचा कोळसा त्या जमिनीतून उत्खनन केला. विशेष म्हणजे उत्खनन केलेल्या हजारो टन कोळशाचा पैसा संस्थेच्या खात्यात जमा न होता विश्वस्तांच्या खिशात गेल्याचा आरोप बंडू देवाळकार यांनी केला.
उक्त सार्वजनिक ट्रस्टची ज्या धार्मिक उद्दिष्टांसाठी नोंदणी करण्यात आली होती, त्यावरील लोकांच्या विश्वासाचे आणि आस्थेचे ट्रस्टच्या विश्वस्तांकडून कायद्याच्या तरतुदींना मोडून त्यांच्या बेकायदेशीर हेतूने भंग केला जात आहे. म्हणून, जगन्नाथ महाराज देवस्थान या सार्वजनिक ट्रस्टच्या जबाबदार विश्वस्तांवर (Trustees) आणि बी. एस. इस्पात लिमिटेड, वरोरा यांच्या विरुद्ध उक्त सार्वजनिक ट्रस्टच्या मालमत्तेचा गैरवापर केल्याबद्दल योग्य कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी बंडू देवाळकर यांनी केली.
संजय देरकर यांनी फेटाळले आरोप
सामाजिक कार्यकर्ता बंडू देवाळकर यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवर पत्रकारांना तोंडी खुलासा देताना जगन्नाथ महाराज देवस्थान संस्थेचे विश्वस्त संजय देरकर यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र त्याबाबत पुरावा म्हणून त्यांनी एकही दस्तावेज पत्रकारांना दिले नाही.
बी. एस. इस्पात कंपनी ED च्या रडारवर..!
मुकुटबन येथे खाजगी कोळसा कंपनी मे. बी.एस. इस्पात लिमिटेड मध्ये सुरवातीपासून अनेक गैरप्रकार सुरु आहे. कोळशाचे अवैध उत्खनन व वाहतूक, तसेच परवानगी नसताना खुल्या बाजारात कोळसा विक्री प्रकरणी कंपनीची चौकशी सुरू आहे. तर आता कोळसा विक्रीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची मनी लॉंड्रिंग प्रकरणी कंपनी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून बी.एस. इस्पात लिमिटेडची चौकशी सुरू आहे.
नुकतेच 12 सप्टेंबर 2024 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने तहसील कार्यालय झरीजामणी यांना पत्र देऊन बी.एस. इस्पात लिमिटेड यांचे मालकीचे मौजा रुइकोट, तह. झरीजामणी येथील गट क्रमांक 46/1, 17/2, 49/1, 49/2, 49/3, 49/4, 19/2, 19/2(अ) व 48/1 या शेत जमिनीचे विक्री, फेरफार, हस्तांतरण, गहाण, धारणाधिकार या सर्व बाबीवर प्रतिबंध लावला आहे.