वणी टाईम्स न्युज : खोट्या कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याच्या नांवाने असलेली शेती, जमीन, प्लॉट परस्पर विक्री करून फसवणूक करणारे अनेक भामटे सक्रिय झाले आहे. अशाच एक प्रकरणात नागपूर येथील खरेदीदाराची 15 लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली. फिर्यादी रमेश उखर्डा म्हसाये (64), रा. रेणुका अपार्टमेंट, मॉडर्न कॉपरेटिव हाऊसिंग सोसायटी छत्रपती नगर नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात दोन दलालांसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज देवराव दानव (50), रा. एकार्जुना ता.वरोरा, प्रवीण गणपत डाहुले (29) रा. पिसदूरा, ता.वरोरा, राजेंद्र नथुजी चिकटे (50) व देविदास वामनराव आंबेकर (50), दोघेही राहणार आनंदवन चौक वरोरा, जिल्हा चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी यांनी मारेगाव तालुक्यातील सुर्ला येथील भूदान यज्ञ मंडळाच्या मालकीची 2 एकर 3 गुंठे शेती स्वतःची भासवत फिर्यादीच्या नावाने रजिस्ट्री केली. मात्र जमिनीच्या फेरफार साठी तलाठी कार्यालयात अर्ज केला असता सदर जमीन भूदान यज्ञ मंडळाच्या मालकीची असल्याने फेरफार होणार नसल्याचे उघड झाल्याने फिर्यादी यास आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
फिर्यादी यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार त्यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये वरोरा येथील राजेंद्र चिकटे व देविदास आंबेकर यांच्या मध्यस्थीने मारेगाव तालुक्यातील सुर्ला शेत शिवारातील सामाईक शेत क्रमांक 117 (अ) मधील 2 एकर 3 गुंठे शेती खरेदी करण्याचा सौदा केला. शेती खरेदी मोबदल्यात फिर्यादी यांनी 8 लाख 66 हजार रुपये रोख दिले. तर राजेंद्र चिकटे यांच्या नावाने 2 लाख, प्रवीण डाहुले यांच्या नावाने 2 लाख 17 हजार व मनोज देवराव दानव यांच्या नावाने 2 लाख 17 हजाराचे धनादेश दिले. त्यानंतर आरोपी यांनी 26 नोव्हेंबर 2019 रोजी 2 एकर 3 गुंठा शेतीची नोंदणीकृत विक्री फिर्यादी यांना करून दिली.
फिर्यादी यांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीचे स्वतःच्या नावाने फेरफार करण्यासाठी सुर्ला येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला असता तलाठी यांनी सदर शेती भूदान यज्ञ मंडळाच्या मालकीची असल्याने त्याची फेरफार होऊ शकत नसल्याचे कळविले. त्यानंतर फिर्यादी यांनी शेत खरेदीत मध्यस्थ राजेंद्र नथुजी चिकटे व देविदास वामनराव आंबेकर सह बनावट शेतमालक मनोज देवराव दानव व प्रवीण गणपत डाहुले यांच्याकडे त्यांचे 15 लाख रुपये परत देण्याची वारंवार मागणी केली. मात्र आरोपीने अद्याप पैसे न दिल्याने फिर्यादी यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात दिलेली फसवणुकीची तक्रारीवरून वरील चारही आरोपीविरुद्ध कलम 3(5), 318(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.