वणी टाईम्स न्युज : वणी पोलिसांनी सोमवारी माजी आमदार विश्वास नांदेकर यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतले. सोमवारी वणी येथील शासकीय मैदानात आयोजित शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभा स्थळकडे जाताना पोलिसांनी नांदेकर यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात स्थानाबद्ध केले. उद्धव ठाकरे यांची सभा संपल्यानंतर विश्वास नांदेकर यांना पोलीस ठाण्यातून सोडण्यात आले.
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचे प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवार 11 नोव्हेंबर रोजी वणी येथे आले असता शासकीय मैदानावर त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान जगन्नाथ महाराज देवस्थान वेगाव या संस्थेची रुईकोट येथील 5 एकर जागा खाजगी कोळसा कंपनीला विकणाऱ्या संस्थेचे सचिव संजय देरकर यांनी तुम्ही मतदान करणार काय ? असे फ्लेक्स बोर्ड घेऊन विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, प्रसाद ठाकरे व 15 ते 20 महिला पुरुष अचानक टिळक चौक येथे पोहचले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांची धावपळ उडाली. उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी यांनी नांदेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सभास्थळकडे जाण्यापासून अडविले. सभे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विश्वास नांदेकर व सर्व कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. तसेच सर्व लोकांना उद्धव ठाकरे यांची सभा संपेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये स्थानाबद्द केले.
व्हिडिओ –