वणी टाईम्स न्युज : बँकेतून रोकड काढून दुचाकीवर नेत असताना यवतमाळ एलसीबी पथक व निवडणूक भरारी पथकाने 60 लाखाची रोकड जप्त केली. शहरातील टागोर चौक येथे सोमवारी दुपारी 4.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम जीनिंग व्यापाऱ्याची असून कापसाचा चुकारा करण्यासाठी त्यांनी बँकेतून रक्कम काढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी निवडणूक विभागाला दिली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम पंचनामा करुन तहसील कार्यालयात कोषागार मध्ये ठेवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वैभव कॉटन प्रा. लिमिटेड पुरड (नेरड) या कंपनीचे स्टेट बँक ऑफ इंडिया, वणी शाखेतून रक्कम काढून कंपनीचे कर्मचारी दुचाकीवर कंपनीचे मालक अशोक भंडारी यांचे घराकडे जात होते. दरम्यान टागोर चौक येथून जात असताना पोलीस व भरारी पथकाने दुचाकी अडविली. दुचाकीवर मागे बसलेल्या इसमा जवळील प्लास्टिक चुंगडीची तपासणी केली असता त्यात 500 रुपयांचे 6 हजार नोट, 100 रुपयांचे 20 हजार नोट व 50 रुपयांचे 20 हजार नोट असे एकूण 60 लाख रुपयांची रोकड आढळली. जप्त रोकड बाबत रात्री उशिरा पर्यंत कारवाई सुरु होती.