जितेंद्र कोठारी, वणी : वणी विधानसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी 11 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरद्वारे वणीत आले होते. उद्धव ठाकरे यांचं हेलिकॉप्टर वणीमध्ये उतरताच त्यांच्या हेलिकॉप्टरकडे येत निवडणूक आयोगाचे भरारी पथकाने त्यांची बॅग आणि हेलिकॉप्टर मधील काही सामान तपासलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर संताप व्यक्त करत तुम्ही इतर सत्ताधारी नेत्यांचे हेलिकॉप्टर तपासता का? असा सवाल केला होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा मोबाईलने व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. निवडणूक आयोगाच्या रूटीन कामावर आक्षेप घेतल्यामुळे विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर आता मात्र आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंची बॅग तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचं कौतुक करून प्रशस्तीपत्र दिले आहे.
या पथकामध्ये भरारी प्रथक प्रमुख नितीन बांगडे, भरारी पथक सहायक अमोल गाठे, पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम डडमल आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव या अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच तपासणी करताना कोणत्याही प्रकारचा निपक्षपातीपणा न करता तसेच निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्वांचे पालन करून जे कार्य केले त्यासाठी या अधिकाऱ्यांना कौतुकाची थाप देण्यात आली आहे
पत्रात काय लिहिले निवडणूक आयोगाने ..
“प्रिय पथक सदस्य, महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 दरम्यान दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजी वणी येथे स्टार प्रचारक यांच्या हेलीकॉप्टरची तपासणी करतांना आपण ज्या मेहनती व समर्पक रितीने जबाबदारी पार पाडली त्याबद्दल मी सामान्य निरीक्षक, 76-वणी व 77- राळेगाव या नात्याने आपले कौतुक करू इच्छितो. या तपासणी दरम्यान भरारी पथकाने निष्पक्षपातीपणा राखुन भारत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून शोध घेतला. या कार्यप्रणालीमुळे भारतातील कोणत्याही निवडणुकीचे अपेक्षित वैशिष्टय असलेल्या निष्पक्षता आणि पारदर्शकतेच्या तत्वांना केवळ बळकटी दिली नाही तर भारत निवडणुक आयोगाकडून अपेक्षित उच्च मानके देखील प्रतिबिंबीत केली. जस-जसे आपण निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात येत आहोत तस-तसे मला आशा आहे की, आपल्या कर्तव्याचा हा स्तर कायम राहील. तुमच्या कर्तव्याप्रती समर्पणाबद्दल आणि आपल्या लोकशाही प्रकियेला आधार देणा-या मुल्यांना मुर्त रूप दिल्याबद्दल धन्यवाद” अशा आशयाचे पत्र विधानसभा निवडणूक मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक म्हणून आर. सज्जन यांनी तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठवले.