वणी टाईम्स न्युज : शहरातील एका भागात आपल्या आई व मोठ्या भावासह राहणारी अल्पवयीन मुलगी काही न सांगता घरून निघून गेली. 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता पासून बेपत्ता असलेली मुलीच्या आईने 20 तारखेला वणी पोलीस स्टेशनमध्ये मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे.
धक्कादायक म्हणजे मुलीच्या आईने दिलेल्या फिर्याद मध्ये फक्त 13 वर्ष वयाची तिच्या मुलीला दारु, सिगारेट व तंबाखूचे व्यसन असल्याचे तसेच यापूर्वीही दोनदा घर सोडून गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे कमी वयातील मुलं मुली व्यसनाच्या विळख्यात अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शहरालगत ले आऊट बनले अय्याशीचे अड्डे
शहरात गुटखा, तंबाखू, सिगारेट, खर्रा यासह गांजा सारखे अमली पदार्थ चौका चौकात सहज मिळत असल्याने तरुणाई व अल्पवयीन मुलं मुली व्यसनाचे अधीन होत आहे. लपून छपून नशा करणाऱ्यांसाठी शहरालगत असलेले ले आऊट अय्याशीचे अड्डे बनले आहे. अंधार पडताच शहरातील नांदेपेरा रोड, घुग्गुस रोड, ब्राह्मणी रोड, वडगाव रोड या मार्गावर मुलं मुली दुचाकीवर जाताना दिसून येतात. विशेष म्हणजे गुटखा, तंबाखू, खर्रा सारख्या मादक पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध असून शहरात खुलेआम याची विक्री होत आहे. फुड अँड ड्रग विभाग तसेच पोलीस प्रशासन या विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई करीत नाही.