वणी टाईम्स न्युज : एका विशिष्ट समाजाबद्दल अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोपावरून भाजप कार्यकर्ता सुधीर साळी याचे भारतीय जनता पक्षातून निष्कासन करण्यात आले आहे. भाजप शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे यांनी एका पत्राद्वारे सुधीर साळी यांचे भाजपचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करून निष्कासनाची कारवाई केली आहे.
भारतीय जनता पक्ष हा सर्व जाती धर्माचा सन्मान करून त्यांना सोबत घेऊन चालणार देशव्यापी पक्ष आहे. आपण एका विशिष्ट (कुणबी) समाजाबद्दल अवमान जनक शब्दांचा वापर केल्याची चर्चा समाज माध्यमातून पुढे आली आहे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नये, त्यासाठी पार्टीचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करून आपल्याला भारतीय जनता पक्षातून निष्कासन करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
आरोप आणि निष्कासनाच्या कारवाई बाबत सुधीर साळी यांनी आपली बाजू मांडताना एक प्रेस नोट काढून सांगितले की, मी मागील अनेक वर्षापासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात कार्यरत असून पत्रकारसुद्धा आहे. माझ्याकडून आजपर्यंत कोणत्याही समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य किंवा माझ्या लेखणीतून जाती धर्माबद्दल चुकीच्या लेखणीचे आरोप झाले नाही. निवडणुकीत राजकीय स्वार्थापोटी माझ्यावर खोटे आरोप करून भाजप उमेदवाराला अडचणीत आणण्याचा हा राजकीय षडयंत्र आहे.