वणी टाईम्स न्युज : कोळसा खाणीतून धुण्यासाठी कोल वाॅशरीमध्ये पाठविलेल्या तब्बल 25 हजार मेट्रिक टन कोळशाची परस्पर विल्हेवाट लावून 10 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी वणी येथील इंडो युनिक फ्लेम कोल वाॅशरीचे व्हाइस प्रेसिडेंट विपुल चौधरी विरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी कोळसा कंपनी मे. बी.एस. इस्पात लिमिटेड, चीनोरा, ता. वरोरा येथील व्हाइस प्रेसिडेंट सागर रामचंद्र कासनगोटूवार, रा. टेलिकॉम नगर, नागपूर यांनी दिनांक 6 मे रोजी याबाबत वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बी.एस. इस्पात कंपनी आणि इंडो युनिक फ्लेम कोल वॉशरी या दोघांमध्ये 5 मार्च 2022 रोजी 41251.14 मेट्रिक टन कोळसा वॉश करुन देण्याचा लेखी करार झाला होता. करारानुसार 6 मार्च 2022 ते 19 जून 2022 पर्यंत बी.एस. इस्पात कंपनीच्या मार्की मांगली-3, मुकुटबन या कोळसा खाणींमधून 41251.14 टन कोळसा वेगवेगळ्या वाहनांमधून कोळसा वॉश करण्यासाठी इंडो युनिक कोल वाशरी, भालर रोड वणी येथे पाठवण्यात आला.
सदर इंडो युनीक फ्लेम लिमीटेड कोल वाशरीत पाठविलेल्या कोळसा पैकी 16219.37 मॅट्रिक टन कोळसा दिनांक 9/03/2022 ते दिनांक 2/03/2023 पावेतो कोळसा वॉश करुन बी.एस. ईस्पात कंपनीत परत करण्यात आला. त्यानंतर सदर कोल वाशरीकडुन कोळसा परत करण्यात आला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी इंडो युनिक फ्लेम कोल वाशरीचे व्हाइस प्रेसिडेंट विपुल चौधरी यांना कॉल करुन तसेच पत्र व ईमेल पाठवुन उर्वरित कोळसा परत करणेबाबत विनंती केली. परंतु कोळसा परत घेणेकरीता कोल वाॅशरी येथे पाठविलेले वाहनांना रिकामे परत करण्यात आले.
फिर्यादी यांनी याबाबत विपुल चौधरी यास विचारणा केली असता त्यांनी वर्ष 2015 मध्ये कोल वाॅशरीमधुन वॉश केलेला कोळसा वेळेवर घेवुन गेले नसल्याने जागेचा किराया व त्यावर व्याजाची रक्कम बी. एस. इस्पात कंपनीकडे थकबाकी असल्याचे उत्तर दिले. बरेचवेळा विनंती केल्यानंतरही आरोपी विपुल चौधरी यांनी कोल वॉश करीता जमा केलेल्या कोळशा पैकी उर्वरीत 25031.77 मेट्रीक टन कोळसा परत केलेला नाही. असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यावरुन आरोपी विपुल चौधरी यांनी बी.एस. ईस्पात लिमीटेड कंपनीचे मालकीचे 25031.77 मेट्रीक टन कोळशाची परस्पर विल्हेवाट लावून 10 कोटी 1 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार फिर्यादी सागर कोसनगोटुवार यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दिली. तक्रारीवरून वरोरा पोलिसांनी आरोपी इंडो युनिक फ्लेम कोल वॉशरीजचे व्हाइस प्रेसिडेंट विपुल चौधरी विरुद्ध कलम 406, 407 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
बी.एस. इस्पात कंपनीही वादाच्या भोवऱ्यात
कोळसा गैरव्यवहार, कोळसा व्यापाऱ्यांचे पैसे दुप्पट करणे यासारख्या गंभीर प्रकरणात बीएस इस्पात कंपनीचा सहभाग उजागर झालेला आहे. कोट्यवधी रुपयांच्या कोळशाच्या गैरव्यवहारात बी.एस. इस्पातचा समावेश असल्याचा मुद्दा विधानसभेतही गाजला. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्याचवेळी बी.एस. इस्पात कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली नागपूरच्या तीन व्यावसायिकांशी दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणही उजेडात आले होते. इंडो युनिक कोल वॉशरीच्या संचालकांना बीएस इस्पात कंपनीकडून 14 कोटी रुपये घ्यायचे असल्याचे सांगण्यात येत आहे. जुने थकबाकी असल्यामुळे कोल वाशरीकडून कोळसा अडविण्यात आल्याची माहिती आहे.