जितेंद्र कोठारी, वणी : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भाजपने आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत वणी विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पुन्हा उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. बोदकुरवार यांना उमेदवारी मिळाल्याने भाजपच्या खेम्यात उत्साहाची लाट उसळली आहे.
संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी रविवारी दुपारी विराणी फंक्शन हॉल मध्ये पत्रकार परिषदचे आयोजन केले होते. पत्रकार परिषद सुरु असताना भाजपची पहिली यादी जाहीर झाली, आणि त्या यादीत संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे नाव असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी स्थानिक शिवाजी महाराज चौकावर पटाखे फोडून आनंद साजरा केला.
भाजप कडून तिकीट मिळविण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांनी आपली शक्ती पणाला लावली. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे खंदे समर्थक तारेंद्र बोर्डे यांनी उमेदवारीसाठी दिल्ली दरबार पर्यंत आपला दावा केला. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विजय चोरडिया यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा आहे. मात्र मागील दोन टर्म मध्ये वणी विधानसभा क्षेत्रात भूतो न भविष्यती असे विकास कामे करणारे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना उमेदवारी मिळण्याची शाश्वती होती.
संजीवरेड्डी बोदकुरवार यांना भाजपकडून उमेदवारी दिल्याने तारेंद्र बोर्डे व विजय चोरडिया यांच्या पदरी निराशा आली आहे. आता तारेंद्र बोर्डे व विजय चोरडिया येत्या विधानसभा निवडणुकीत संजीवरेड्डी बोदकुरवार यांना मदत करणार की, वेगळी चूल मांडणार ? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.