वणी टाईम्स न्युज : दीड वर्षापूर्वी तहसील कार्यालय परिसरात अनोळखी व्यक्तीचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने आणखी एका अनोळखी इसमाचा खून करण्याचा प्रयत्न केला. गुरुवार 27 मार्च रोजी सकाळी यवतमाळ मार्गावर बाकडे पेट्रोल पंप जवळ अनोळखी व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पोलिसांना आढळला होता. जखमी व्यक्तीला उपचारासाठी नागपूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही फूटेजची तपासणीनंतर सदर अनोळखी इसमाला आरोपी अनिकेत दादाराव कुमरे, रा. सिंधी, ता. मारेगाव यांनी बेदम मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
वणी पोलिसांना गुरुवार 27 मार्च रोजी सकाळी येथील यवतमाळ रोडवरील बाकडे पेट्रोल पंप जवळ अंदाजे 45 ते 50 वर्ष वयाचा एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. जखमी व्यक्ती हा बेशुद्ध व अर्धनग्न अवस्थेत फक्त अंडरवेअर मध्ये उताण्या अवस्थेत पडून होता. तर त्याचे कपडे बाजूला पडून होते. इसमाच्या ओठावर, भुवयावर तसेच डोक्यावर तीक्ष्ण वस्तुने वार करुन गंभीर जखमी करण्यात आले होते.
पोलिसांनी जखमीला प्रथम वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. ग्रामीण रुग्णालयात डॉ. पोहे यांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून त्याला चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपूर येथे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमीची ओळख पटविण्यासाठी तसेच बयान घेण्यासाठी पीएसआय अश्विनी रायबोले ह्या चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या होत्या. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने बयान नोंदविता आले नाही. त्यामुळे जखमीची अद्याप ओळख पटली नाही.
फक्त 100 रुपयांसाठी आरोपीने केला होता खून
अनोळखी इसमावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी अनिकेत दादाराव कुमरे हा सराईत गुन्हेगार व विकृत प्रकृतीचाआहे. 22 ऑगस्ट 2023 रोजी त्यांनी तहसील कार्यालय मागे निर्माणधीन इमारतीत त्यांनी दारूसाठी 100 रुपये दिले नाही म्हणून एका अनोळखी व्यक्तीच्या डोक्यावर विटाने प्रहार करून खून केला होता. त्याही वेळी मृतक हा विवस्त्र अवस्थेत आढळला होता. त्यामुळे आरोपी हा दारूच्या व्यसनी सोबतच विकृत प्रकृतीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.