वणी टाईम्स न्युज : चोरट्या मार्गाने उपसा करून आणलेली रेती खाली करताना ट्रॅक्टर नायब तहसीलदार यांनी पकडला. मात्र कारवाई सुरू असताना मुजोर रेती तस्कर हा नायब तहसीलदार व तलाठी समोर रेती भरलेला ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असताना नायब तहसिलदार यांनी ट्रॅक्टरवर चढून चाबी काढून घेतली. तरी सुरु असलेला ट्रॅक्टर आरोपीने पळवून नेला. या झटापटीत तोल जाऊन नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार हे ट्रॅक्टरवरुन खाली पडले. रविवार दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 11 वाजता नांदेपेरा गावात घडलेल्या या घटनेबाबत नायब तहसीलदार खिरेकार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नांदेपेरा येथे भरदिवसा रेती तस्करी होत असल्याची अनेक तक्रारी तहसील कार्यालयात प्राप्त झाल्या. तक्रारीवरून नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार हे तलाठ्याला सोबत घेऊन दुचाकीवर नांदेपेरा येथे पोहचले. त्यावेळी त्यांना एक ट्रॅक्टर रेती खाली करताना दिसून पडला. महसूल अधिकाऱ्यांना पाहताच चालका गणेश गोहोकार यांनी ट्रॅक्टर पळवून नेण्याच्या प्रयत्न केला. परंतु नायब तहसीलदार खिरेकार यांनी ट्रॅक्टरवर चढून चाबी काढून घेतली. या झटापटीत नायब तहसीलदार खिरेकार यांचा तोल जाऊन ते जमिनीवर पडले.
दरम्यान सुरु असलेला ट्रॅक्टर घेऊन आरोपी गणेश नंदकिशोर गोहोकार, रा. नांदेपेरा हा पसार झाला. ट्रॅक्टरची चाबी आणि चालकाचा गमछा हा महसूल अधिकाऱ्यांनी जप्त केला. गावात ट्रॅक्टरचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. नायब तहसीलदार खिरेकार यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश नंदकिशोर गोहोकार हा सराईत रेती तस्कर असून एक महिन्यापूर्वीच पोलिसांनी त्याचा ट्रॅक्टर पकडला होता. मात्र ट्रॅक्टर सुटताच त्यांनी पूर्ववत रेती तस्करीचा धंदा सूरु केला.
रेती तस्करी विरुध्द कारवाई दरम्यान घडलेल्या या घटनेबाबत तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांना माहिती देण्यात आली असून त्यांच्या निर्देशानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार खिरेकार यांनी सांगितले.