जितेंद्र कोठारी, वणी : पोलीस कर्मचाऱ्यांसह आरोपीला वॉरंट बजावण्यासाठी गावात गेलेल्या पोलीस शिपाई राजेंद्र कुडमेथे यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करुन खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अनिल लेतू मेश्राम (41) रा. हिवरी, ता. मारेगाव असे आरोपीचे नाव आहे. पांढरकवडा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. देशमुख यांनी शनिवारी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली.
प्राप्त माहितीनुसार गैरजमानती वॉरंटची बजावणी करण्याकरीता मारेगाव पोलीस स्टेशन मधील पोलिस हवालदार मधुकर निळकंठ मुके, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद खुपरे व पो. शिपाई राजेंद्र बाजीराव कुडमेथे हे 26 नोव्हेंबर 2018 रोजी रात्रीच्या सुमारास शासकिय वाहनाने आरोपीचे गावी मौजा. हिवरी ता. मारेगाव जि. यवतमाळ येथे गेले होते. आरोपी अनिल लेतु मेश्राम यांनी वॉरंटची बजावणी करण्यास अडथळा निर्माण करुन पोलिसांवर हल्ला चढविला. आरोपीने पोलीस शिपाई राजेंद कुडमेथे यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार करुन त्याला जागीच ठार केले. तर ईतर पोलीस कर्मचाऱ्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याना जख्मी केले.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पोलिस कर्मचा-याची साक्ष व शवविच्छेदन अहवालावरून फिर्यादी मधुकर मुके याने पो स्टे मारेगाव येथे घटनेचा रिपोर्ट दिला. त्यावरून पो.स्टे. मारेगाव येथे आरोपी अनिल लेतू मेश्राम विरुद्ध कलम 302, 307, 353, 333, 332, 324 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवुन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यानी तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते.
प्रस्तुत प्रकरणात अभियोजन पक्षाने एकूण 9 साक्षदार तपासले. तसेच बचाव पक्षातर्फे कोणीही तपासण्यात आले नाही. अभियोग पक्षातर्फे न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेला सबळ पुरावा आणि सहायक सरकारी अभियोक्ता ऍड. रमेश डी मोरे यांचा युक्तिवाद ग्राहय धरून परिक्षण न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व रु 10 हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 6 महिन्याचा सश्रम कारावास व इतर गुन्हया अंतर्गत वरील प्रमाणे शिक्षा ठोठावण्यात आली. प्रस्तुत प्रकरणाचा तपास अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी तपास केला व पैरवी अधिकारी म्हणून एएसआय दिपक गावंडे यांनी काम पाहिले.
आरोपीच्या शोधात 250 पोलीस आणि 21 दिवस
पोलीस शिपायांची हत्या केल्यानंतर आरोपी अनिल मेश्राम हा जंगलात पळून गेला होता. आरोपीच्या शोधात तब्बल 250 पोलिसांचा ताफा लावण्यात आला होता. आरोपीला जंगल परिसराची संपूर्ण माहिती तसेच आरोपीकडे मोबाईल नसल्यामुळे तो पोलिसांना हुलकावणी देत होता. तब्बल 21 दिवस पांढरकवडा, मारेगाव, झरीजामनीच्या जंगलात पायपीट केल्यानंतर जंगलात लपून बसलेला आरोपी पोलिसांच्या हाती लागला.