जितेंद्र कोठारी, वणी : उपविभागात शेतकरी आत्महत्येच्या यादीत सोमवारी आणखी एक नाव जोडल्या गेला. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील एका युवा शेतकऱ्यांनी गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविली. उमेश अशोक नक्षणे (36) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा नाव आहे. त्यांनी बैल बांधण्याच्या गोठ्यामध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सोमवार 29 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक उमेश नक्षणे यांच्यामागे कुटुंबात आई, पत्नी, मुलगा, मुलगी आहे. त्यांनी आत्महत्या करण्यासारखा टोकाचा पाऊल का उचलला याबाबत अद्याप कारण स्पष्ट झाले नाही. मारेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे
शेतकरी आत्महत्येसाठी आर्थिक कारणांसोबतच नैसर्गिक आपत्ती देखील जबाबदार आहे. अतिवृष्टी, पूर, अनियमित मान्सून, दुष्काळ, पावसाला विलंब, अति चक्रीवादळ आणि अनुदानात कपात यासारख्या इतर कृत्रिम घटकांमुळे अल्प भूधारक शेतकरी पूर्णपणे खचला आहे. अनिश्चित पाऊस, अल्प उत्पादन तसेच खत, बियाणे, कृषी निविष्ठांच्या किमतीत वाढ, मुलांचे उच्च शिक्षण, आरोग्य खर्च अश्या अनेक कारणांमुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे आर्थिक विवंचना आणि नैराश्यातून शेतकरी शेवटचा पर्याय म्हणून मृत्यूला जवळ करीत असल्याचे अनेक अहवालात म्हटले आहे. एरवी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे समोर येत आहे.