जितेंद्र कोठारी, वणी : खर्रा खाण्याचा शौक अल्पवयीन मुलीच्या जीवावर बेतला. खर्रा खाते म्हणून आई रागावत होती. त्यामुळे 15 वर्षाच्या मुलीने रागाच्या भरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना वणी पोलीस स्टेशन अंतर्गत रासा येथे शनिवार 20 जाने. रोजी सायंकाळी 4 वाजता उघडकीस आली. ज्योत्सना अय्या आत्राम (15) रा. पेंढरी, ता. मारेगाव असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी अय्या आत्राम हा रासा येथील राखुंडे यांचे शेतावर सालगडी म्हणून काम करते. शेतातील बंड्यात तो आपल्या पत्नी व मुलगी ज्योत्सनासह राहून शेतात काम करीत होता. त्याच्या मुलीला खर्रा खाण्याच्या नाद असल्याने तिची आई तिच्यावर रागावात होती. तरी पण तिन खर्रा खाणे सोडले नाही. शनिवारी सायंकाळी 4 वाजता दरम्यान मुलगी शेतात संडासला गेली होती. बराच वेळ होऊन मुलगी परत आली नाही म्हणून तिची आई तिला पाहणे करिता गेली असता मुलगी शेजारील उईके यांचे शेतात आपट्याच्या झाडाला ओढणीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसली.
मुलीच्या आईने आरडओरड करून नवऱ्याला आवाज देऊन बोलाविले. त्यानंतर फिर्यादी यांनी शेतमालक यांना फोन करून घटनेची माहिती दिली. शेतमालक महेंद्र राखुंडे व तंटामुक्त समिती अध्यक्ष मिलमिले यांनी ज्योत्सना हिला खाली उतरवून दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला. वडील अय्या आत्राम यांनी वणी पोलीस ठाण्यात मुलगी खर्रा खात होती म्हणून आईने रागावल्याने अल्पवयीन मुलीने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार नोंदविली.