वणी टाईम्स न्युज: येथील साई मंदिर ते नांदेपेरा बायपास चौफुली पर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून बांधकाम विभागाच्या वेळ काढू धोरणामुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहे. या मार्गावर सिमेंट रस्त्यासाठी 6 महिन्यापूर्वी कोट्यवधीचा कंत्राट काढण्यात आला आहे. मात्र कंत्राटदारांनी फक्त काही ठिकाणी नालीचे बांधकाम करून काम बंद केलं आहे.
अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर खड्ड्यातून मार्ग शोधून वाहने चालवावी लागत आहे. रस्त्यासाठी नागरिकांनी अनेकदा बांधकाम विभागला तोंडी व लेखी निवेदने दिली. मात्र 6 महिन्यापासून बांधकाम विभागातील अधिकारी वेळ मारून नेत आहे. आता तर या मार्गावर पायी चालणे अवघड झाले आहे. त्यामुळे नुकतेच 31 मे रोजी नांदेपेरा मार्गावरील नागरिकांनी बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्त्याचे काम तत्काळ सुरु न केल्यास 5 जून रोजी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
परंतु निगरगट्ट अधिकाऱ्यांनी या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे नांदेपेरा मार्गावरील राहणाऱ्या नागरिकांच्या वतीने गुरुवारी सकाळी 9 वाजता नांदेपेरा मार्गावरील वर्हाडी धाब्याजवळ शांतीपूर्वक मार्गाने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या रस्ता रोको आंदोलनाला मोठ्या संख्येने नागरिक व वाहन चालकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.