वणी टाईम्स न्युज : शेतीतील सततचे अपयश, कमी होत चाललेले उत्पन्न आणि डोक्यावर असलेले थकीत कर्ज या सर्व संकटांना कंटाळून वृद्ध शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रभाकर आत्माराम निखाडे (68) राह. चोपण, तालुका मारेगाव असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदर घटना 22 मे रोजी दुपारी 1 ते 2 वाजता सुमारास चोपण येथे उघडकीस आली.
माहितीनुसार मृतक प्रभाकर निखाडे यांच्याकडे साडे पाच एकर शेती असून ते आपल्या दोन मुलांसह शेती करीत होते. 12 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. गेल्या काही वर्षांपासून नापिकी, खर्चाचे प्रमाण वाढणे आणि थकीत कर्जाचा बोजा वाढल्याने ते मानसिक तणावात होते. गुरुवार 22 मे रोजी सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचले, पान टपरीवर काही वेळ थांबून दुपारी एक वाजता घराकडे रवाना झाले. मात्र त्यानंतर त्यांनी कडू निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
मृतक प्रभाकर निखाडे यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, नातवंडे आणि आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात आली असून मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. प्रशासनाने मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.