वणी टाईम्स न्युज : तालुक्यात कुठलाही रेती घाट सुरु नसताना अवैधरीत्या उत्खनन करुन विना परवाना रेतीची वाहतूक करणारा हायवा बुधवारी सकाळी 10.30 वाजता साईनगरी येथे स्वतः तहसीलदारांनी पकडला. तब्बल 8 ब्रास रेती भरलेला ट्रक जप्त करून तहसील परिसरात उभा करण्यात आला आहे. ट्रक व रेतीचा पंचनामा करण्यात आला असून जप्तीतील हायवा ट्रक बाबत परिवहन विभागाकडून अधिक माहिती मागविण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात रेती तस्करीला आलेल्या उधाणाबाबत माजी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच्या सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर महसूल मंत्र्याच्या आदेशाने महसूल विभागाची संपूर्ण यंत्रणा पुनः कार्यान्वित (Re Activate) करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाने स्वतः तहसीलदार फील्डमध्ये उतरले असून गोपनीय माहितीवरून तहसीलदार निखिल धुळधर यांनी शहरातील साई नगरी येथे धाड टाकली. त्यावेळी तब्बल 8 ब्रास रेती भरलेला टाटा हायवा क्रमांक MH34-BG6899 त्यांना दिसून पडला.
तहसीलदार यांनी ट्रक चालकाला रेतीची रॉयल्टी व वाहतूक पास बाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतेही अधिकृत दस्तावेज मिळाले नाही. सदर ट्रक मध्ये भरलेली रेती बेकायशीर असल्याची खात्री करुन ट्रक जप्त करण्यात आले. परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नमूद माहितीनुसार सदर हायवा ट्रक चंद्रपूर RTO मध्ये नोंदणीकृत असून जगदीशसिंग दिक्षित यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे.