वणी टाईम्स न्युज : झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन फॉरेस्ट रेंज अंतर्गत हिरापूर बीट मधील महिला वन रक्षक सुलभा जुनघरे हिचे निलंबन करण्याची मागणीला घेऊन अडेगाव येथील 4 युवकांनी सोमवार 24 मार्च पासून आमरण उपोषण सुरु केला आहे. वणी येथील सहा. वन संरक्षक कार्यालयासमोर उपोषणकर्ते बंडू गोहणे, रविंद्र गाडामोडे, दिनेश जीवतोडे देवानंद गाडामोडे उपोषणावर बसले आहे. सोमवारी सहाय्यक वनसंरक्षक संगीता कोकणे यांनी उपोषणकर्त्याशी चर्चा करून चौकशी करण्याचे तोंडी आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत दोषी महिला वन रक्षकाची बदली किंवा कारवाईचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.
महिला वन रक्षक सुलभा जुनघरे, तिचा भाऊ तसेच वन मजूर अमोल टोंगे व स्वप्नील खडसे यांनी 2 मार्च 2025 रोजी अडेगाव येथील कवडू गोहणे यांचा ट्रॅक्टर अवैधरीत्या थांबवून त्याच्याकडून बळजबरीने 40 हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी यांनी मुकुटबन येथील उप वन संरक्षक कार्यालय तसेच पांढरकवडा वन विभागात लेखी तक्रार देऊन वनरक्षक व दोन्ही वन मजुरांवर कारवाईची मागणी केली. मात्र 20 दिवसानंतर ही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
त्यामुळे वनरक्षक सुलभा जुनघरे हिचे निलंबन करणे, वन मजूर अमोल टोंगे व स्वप्नील खडसे यांना कामातून कमी करणे तसेच दोन्ही वन मजुरांसह वनरक्षक जुनघरे हिचा भाऊ यांच्यावर कलम 392 नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणीला घेऊन अडेगाव येथील युवकांनी आमरण उपोषणाचा मार्ग निवडला.