वणी टाईम्स न्युज : राज्यात रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणावर फोफावली असून या विषयावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी पकडण्यात आलेले वाहन आठ दिवसात सरकारने आपल्या नावावर करुन घ्यावं. अशी मागणी भाजप आमदार व माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला केली आहे. विधानसभेत रेती तस्करीच्या मुद्द्यावर मुनगंटीवार यांनी शासनाच्या धोरणावर ताशेरे ओढले.
रेती धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना अर्ज केल्याचे 15 दिवसात रेती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र रेतीच्या अभावी एक एक दोन दोन वर्षापासून घरकुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना 15 दिवसात रेती उपलब्ध न करुन दिल्यास तहसीलदारावर कारवाईची मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. यावेळी मुनगंटीवार यांनी रेती चोरीची तक्रार करणाऱ्यावर हल्ले होतात तर रेती चोरी करणारे हे अधिकाऱ्यांच्या हृदयामध्ये राहतात अशी खंत व्यक्त केली.
मुनगंटीवार यांनी स्वतःच्या पक्षाच्या सरकारला धारेवर धरल्यामुळे महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाचक्की झाली आहे. मुनगंटीवार यांचे प्रश्नाचे उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्या रेती धोरणात घरकुल लाभार्थ्यांना 15 दिवसात मोफत रेती उपलब्ध करुन न दिल्यास तहसीलदारावर कारवाईचा कायदा करणार असल्याची घोषणा केली.
रेती तस्करांना महसूल अधिकाऱ्यांच्या सपोर्ट ..?
तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव झालेला नसताना दररोज शेकडो ब्रास रेती शहरात खाली होत आहे. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर रेतीचे ढिगारे असताना महसूल विभाग झोपेचे सोंग घेऊन आहे. रात्री 2 वाजे पासून तर सकाळी 8 वाजे पर्यंत चारही दिशेने शहरात ट्रॅक्टर, ट्रक, हायवा भरून शहरात प्रवेश करताना नागरिकांना दिसतेय. परंतु महसूल अधिकारी महिन्यात 2 ते 4 ट्रॅक्टर पकडून कागदी कार्यवाही पूर्ण करुन घेतात.
रेती चोरी व्यवसायातून मोठी घटना होण्याची शक्यता
वणी, वरोरा, घुग्गुस येथील रेती चोरट्यांनी पैनगंगा व वर्धा नदी पात्रात अनेक ठिकाणी स्वतःचे घाट तयार केले आहे. त्या घाटातून त्यांच्या शिवाय कोणीही दुसरा रेती चोरी करू नये. असे अलिखित नियम आळल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी शिंदोला परिसरातील पैनगंगा नदीतून रेती उत्खनन करुन निघालेल्या वणीतील एका रेती तस्कराच्या ट्रकला स्थानिक रेती तस्करांनी अडविले. आमच्या घाटातून रेती काढायची नाही. अशीही दमदाटी करण्यात आली. त्यामुळे रेती चोरीच्या या व्यवसायात वर्चस्वातून एकाद्या दिवशी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.