वणी टाईम्स न्युज : घरात सोनं भरलेले 3 हांडे असून ते काढून देण्याचा भूलथापा देऊन इसमाला 2 लाख 65 हजाराचा गंडा घालणाऱ्या 3 भामट्यांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा कन्हैया येधानी (27) रा. कवठा, पो. आष्टा, जि. नागपूर, जितेंद्र जिवन राठोड (29), रा.आसोला सावंगी, जि. नागपूर व सुशील राजेश द्विवेदी (36), रा तारशी, पोस्ट बोरखेडी जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी कडून मुद्देमाल व घटनेत वापरलेली इनोव्हा कार क्रमांक MH 44 B 0055 जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे

फिर्यादी विजय महादेव टोंगे (44) रा. अंतरगाव, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून आरोपी कृष्णा येधानी ऊर्फ कृष्णाजी वैदय ह. मु. गिट्टीखदान नागपूर यांनी तुमच्या घरात जमिनीत सोन्याचा हंडा दबून आहे. तो जर काढला नाही तर कुटुंबीयांना काही तरी अनिष्ट होण्याची भीती दाखवली. त्यानंतर भामट्याने 5 मार्च 2025 रोजी आपले साथीदार जीवन राठोड याच्यासह फिर्यादी इसमाचे घर गाठून पूजा सामुग्री आणण्याच्या नावावर 1 लाख 65 हजार रुपये उकळले. त्यानंतर आरोपीने सोने काढण्यासाठी काही तरी सोना चढवावा लागतात, अस म्हणून फिर्यादीकडून 11 ग्राम सोन्याची गोप घेतली.
एवढंच नव्हे तर घरात आणखी दोन हांडे असून ते काढण्यासाठी 12 लाख रुपये लागेल. तसेच हंडे न काढल्यास फिर्यादी किंवा त्याच्या मुलाला काही तरी होईल अशी भीती दाखवली. या सगळ्या बाबीवरून फिर्यादी यांना संशय आला व त्यांनी ही गोष्ट त्याच्या साळयाला सांगितली. दोघांनी संगनमत करुन आरोपीला 12 लाख रुपये देण्याचे कबूल करुन गावी येण्यास सांगितले. मात्र आरोपी त्याच्या गावी येण्यास टाळाटाळ करु लागले. तेव्हा फिर्यादी यांनी आरोपींना वणी येथे जंगली पीर दर्ग्याजवळ भेटण्यास बोलाविले.
रविवार 16 मार्च रोजी दोन्ही आरोपी इनोव्हा कार क्रमांक MH44 B 0055 मध्ये ठरलेल्या ठिकाणी पोहचले. तेव्हा फिर्यादी विजय टोंगे यांनी मला सोन्याचे हांडे काढायचे नाही, तुम्ही माझे पैसे व सोन्याची गोफ परत द्या, असे सांगितल्याने आरोपी शिवीगाळ करुन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादी, त्याचा साळा व सहकाऱ्यांनी कार चालक व त्या दोघांना पकडून पोलिसांना पाचारण केले.
फिर्यादी इसमाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 318 (4), 352, 351 (2), 351(3) BNS अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख 50 हजार रोख, 11 ग्राम 340 मिली वजनाची सोन्याची चेन किंमत 90 हजार तसेच गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार किंमत 7 लाख असे एकूण 9 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात डि बी पथक प्रमुख PSI धिरज गुल्हाने, पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख, गजानन, निरंजन, मोनेश्वर डि.बी. पथक वणी यांनी केली.