वणी टाईम्स न्युज : समाजमन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना सोमवार 3 मार्च रोजी मारेगाव तालुक्यात उजेडात आली. अवघ्या 3 वर्षाच्या अबोध बालिकेवर एका अल्पवयीन आरोपीने गोठ्यात नेऊन बलात्कार करणाऱ्याचा प्रयत्न केला. बालिकेसोबत अश्लील चाळे करताना तिचे आईवडील घरी आल्याने पुढील अनर्थ टळला. पीडित बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी 15 वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतला.
मारेगाव तालुक्यातील एका गावात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या दांपत्याची 3 वर्षाची मुलगी रविवारी सायंकाळी 5 वाजता घराबाहेर खेळत होती. तर तिची आजी घरात होती. मुलीला एकटी पाहून गावातीलच एका 15 वर्षीय मुलाने तिला उचलून जनावर बांधण्याच्या गोठ्यात नेले. गोठ्यात तिच्या सोबत अश्लील चाळे करीत असताना चिमुरडीचे आईवडील घरी आले. कुणीतरी आल्याची चाहूल लागताच आरोपीने गोठ्यातून पळ काढला.
जनावरांच्या गोठ्यातून मुलगा बाहेर निघताना पाहून फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले असता तिथं त्यांची 3 वर्षाची मुलगी दिसून पडली. काही तरी चुकीचे झाल्याचा संशय आल्याने त्यांनी मुलीला विचारपूस केली असता चिमुरडीने तुटक्या भाषेत आरोपी मुलाने तिच्या सोबत केलेले कृत्य सांगितले.
मुलीसोबत घडलेल्या प्रसंगामुळे घाबरलेल्या वडिलांनी तत्काळ मारेगाव पोलीस ठाणे गाठून पोलिसांना हकीकत सांगितली. फिर्याद वरून पोलिसांनी आरोपी विधी संघर्षग्रस्त बालकावर कलम 65(2), 64(2) व बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा (पॉक्सो) कलम 3(b), 4,5 (m), 6 अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी बालकास ताब्यात घेतले. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
इंटरनेटवर अश्लील व्हिडिओचा पूर, लैंगिक अत्याचारात वाढ
खरं तर, इंटरनेट हे विज्ञानाने दिलेले वरदान आहे. यामुळे प्रत्येकाचे जीवन सोपे झाले आहे. पण इंटरनेटच्या माध्यमातून लैंगिक गुन्हेही वाढले आहेत. आज इंटरनेटवर अश्लीलता पसरवली जात आहे. हे अश्लील चित्रपट अल्पवयीन मुलांची आणि तरुणांची मानसिकता विकृत करत आहेत, ज्यामुळे तरुणांमध्ये लैंगिकता वाढत आहे आणि ते लैंगिक गुन्ह्यांकडे वळत आहेत.