वणी टाईम्स न्युज : बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या दोघांना वणी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेले 2 मोबाईल जप्त केले. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी बसमध्ये चढताना दोन विद्यार्थांच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी महागडे मोबाईल लंपास केले. मोबाईल चोरी गेल्याचे लक्षात येताच विद्यार्थांनी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तोंडी तक्रार केली.
तक्रार मिळताच ऑन ड्युटी पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील व नवघरे यांनी तत्काळ बस स्थानक गाठून गोपनीय माहितीचे आधारे एका तासाच्या आत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विद्यार्थ्यांकडून चोरलेले मोबाईल हस्तगत केले. चोरी गेलेले मोबाईल पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेने एका तासात परत मिळाल्याने फिर्यादी विद्यार्थी आकाश विशाल भोयर व इतर एक विद्यार्थिनी या दोन्ही विद्यार्थांच्या पोलिसांवरती विश्वास दृढ झाला.
शैक्षणिक काम असल्यामुळे विद्यार्थ्याने चोरट्याविरुद्ध लेखी तक्रार देण्यास असमर्थता दर्शविली. तथापि पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या आरोपीविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल पाटील व पोलीस कॉन्स्टेबल ललित नवघरे यांनी केली.