सुशील ओझा, झरी : मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत गाडेघाट येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी सासरवाडीच्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मृतक याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या आत्महत्येमागे जबाबदार लोकांचे नाव एका बुकमध्ये लिहून झाडाखाली ठेवले. तसेच त्याची फोटो फेसबुकवर सुद्धा अपलोड केली होती. सुसाईड नोटमध्ये नमूद नावाच्या आधारावर मुकुटबन पोलिसांनी मृतक संदीप येरगुडे यांच्या सासरवाडीतील 6 जणांवर आत्महत्येसाठी प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार वणी तालुक्यातील गाडेघाट येथील संदीप येरगुडे (40) हा 7 जानेवारी पासून घरून बेपत्ता होता. दिनांक 9 जानेवारी रोजी त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह जंगलात झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. संदीप याने 2009 मध्ये सविता गजानन माथुलकर हिच्यासोबत लव्ह मॅरेज केलं होतं. त्याला एक मुलगा व एक मुलगी असं दोन अपत्य आहे. लग्नाच्या काही वर्षांनंतर एकामेकावर संशय धरून पतिपत्नीमध्ये वाद व्हायला लागले.
दोघांत भांडण झालं की संदीपची पत्नी सविता माहेरी निघून जायची. काही महिन्यापूर्वी संदीप त्याच्या मुलाला व मुलीला घेऊन पत्नी सविताला आणण्यासाठी त्याची सासरवाडी सिदुर ता. चंद्रपूर येथे गेला असता सासरवाडीतील लोकांनी त्याला मारहाण केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अपमानित होऊन संदीपने आत्महत्या केल्याचे संदीपची बहिण योगिता मनोज भोपरे, रा. मारेगाव हिने मुकुटबन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
मृतक संदीप येरगुडे यांनी त्याच्या आत्महत्येसाठी सासरा गजानन मारोती माथुलकर, सासू उषा गजानन माथुलकर, साला सूरज माथुलकर व अजय माथुलकर सर्व रा. सिदुर ता. चंद्रपूर तसेच साळी कविता श्रीकांत निखाडे व तिचा पती श्रीकांत निखाडे, रा. थेरुर, ता. भद्रावती जि. चंद्रपूर हे जबाबदार असल्याचे कागदावर लिहिले होते. सुसाईड नोट व तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी सर्व आरोपी विरुद्ध भान्यास कलम 3(5) व 108 नुसार गुन्हा दाखल केला आहे.