वणी टाईम्स न्युज : वणी येथे घडलेल्या गोवंश हत्या व अवैध कत्तलखाना प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत मिळाले आहे. यात दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी तर एकाचे निलंबन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान गोसेवा आयोगाने नेमलेल्या समितीचे चौकशी अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्री कार्यालयात सादर करण्यात आले आहे. या गंभीर घटनेवर मुख्यमंत्री काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शहरात गाईचे दोन शीर व शेकडो गोवंशाचे अवशेष मिळाल्यानंतर गोसेवा आयोग समितीने दौरा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. गोसेवा समितीच्या चौकशी अहवालात दीपक चौपाटी बीट जमादार व बीट अधिकारी हे गोहत्येच्या घटनेसाठी मुख्य जबाबदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर वणीचे ठाणेदार व नगर परिषद मुख्याधिकारी यांनी गोहत्या प्रकरणाची चौकशीत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे.
चार दिवसात होणार कारवाई..!
गोवंश हत्या प्रकरणी चौकशीत हलगर्जीपणा करणाऱ्या एका अधिकाऱ्याचे बदलीचे आदेश निघाले होते. मात्र प्रशासनिक कारणास्तव ते थांबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 3 ते 4 दिवसात त्या अधिकाऱ्यांची हमखास उचलबांगडी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र तो अधिकारी कोण ? हे कारवाईनंतरच कळणार.