वणी टाईम्स न्युज : गावात सोडून देतो, अशी बतावणी करून दुचाकीवर बसवून रस्त्यात लुटमार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद जुबेर अब्दुल सलाम (33) व अशफाक उर्फ अयान खान साहेबखान पठाण (28) दोघं रा. खरबडा मोहल्ला वणी असे आरोपीचे नाव आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवरगाव येथील किशोर रामचंद्र ठावरी (51) हा वणी येथून गावात जाण्यासाठी बस स्थानकाकडे पायदळ जात होता. दरम्यान बाकडे पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याला गावात सोडून देतो अशी बतावणी करून दुचाकीवर बसविले. वणी कायर मार्गावर अठरा नंबर पुलाजवळ दोघांनी किशोर याला मारहाण करून 4 हजार 800 रुपये रोख व एक मोबाईल लुटून पसार झाले.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज चेक करून दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून लुटलेली रक्कम, मोबाईल तसेच लूटमारीच्या घटनेत वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.