वणी टाईम्स न्युज : गावाला सोडून देतो असं म्हणत दोन अनोळखी इसमांनी एका व्यक्तीला दुचाकीवर बसविले आणि रस्त्यात मारहाण करुन त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पोबारा केला. वणी मुकुटबन मार्गावर शुक्रवार 10 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता दरम्यान घडली. फिर्यादी किशोर रामचंद्र ठावरी (51) रा. नवरगाव ता. वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी दोन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हा शुक्रवार वणी येथे एका थेरेपी केंद्रात अक्युपंचर थेरेपी करून परत गावी जाण्यासाठी बस स्टँडकडे पायदळ जात होता. बाकडे पेट्रोल पंपाजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याला तुम्ही कुठं चालले अशी विचारणा केली. फिर्यादी यांनी मी आपल्या गावी नवरगाव येथे चाललो अस म्हंटले असता दुचाकीवरील एकाने आम्हीही नवरगाव येथे जात आहे तुम्हाला सोडून देतो. अस म्हणून दुचाकीवर बसवून घेतले.
वणी मुकुटबन मार्गावर अठरा नंबर रेल्वे पुलापासून त्यांनी दुचाकी मेंढोली मार्गाकडे वळविली. थोडं पुढे जाऊन दुचाकी थांबवून त्यांनी किशोरला खाली उतरविले व त्याच्यासोबत मारहाण करून पँटच्या खिशातील 4 हजार 800 रुपये व विवो कंपनीचा जुना मोबाईल हिसकावून पळ काढला. त्यानंतर फिर्यादी हा घाबरलेल्या अवस्थेत पायदळ गावी पोहचला. घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी यांनी 10 तारखेला वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात दोन आरोपीविरुद्ध कलम 3(5) व 309 (4) नुसार गुन्हा दाखल केला आहे.