वणी टाईम्स न्युज : वणी शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे तसेच अवैध वाहतूक फोफावली आहे. वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहरानी यांचे कार्यकाळात अवैध धंद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांची बदली करुन कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. अशी मागणी श्री रामनवमी उत्सव समितीने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. गुरुवार 9 जानेवारी रोजी समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांचे नेतृत्वात समिती सदस्यांनी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले.
वणी शहर तसेच पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे (मटका, जुगार, कोंबडबाजार, झंडीमुंडी, चेंगड, कोळसा तस्करी, रेती तस्करी, ड्रग्स, सुगंधीत तंबाखु गुटखा, गांजा) या सारखे अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. त्याच प्रमाणे लुटमार, घरफोडी, अपघात, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहरात प्रवासी अवैध वाहतुक, ऑटो चालकांची मनमानी तसेच अल्पवयीन मुलं धूम स्टाईलने वाहने चालवीत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरात वाहतूक नियंत्रण शाखा कार्यान्वित असताना बेलगाम वाहतूकीवर वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वणी ठाणेदारांनी अवैध व्यावसायिकांना पूर्णतः मोकळीक दिली असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी डोके वर काढले आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस प्रशासनाचा ज्या प्रमाणे वचक असायला पाहीजे तो नाहीसा झालेला दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे ठाणेदार अनिल बेहरानी यांची तात्काळ बदली करुन कडक प्रशासन निर्माण करणारे पोलीस निरीक्षकांची वणी ठाणेदारपदी नियुक्ती करावी. अशी मागणी रामनवमी उत्सव समितीने केली आहे. निवेदनाची योग्य दखल न घेतल्यास श्री रामनवमी उत्सव समिती सामान्य वणीकर नागरिकांसह एक दिवसीय धरणे आंदोलन करणार. तसेच राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देऊन आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना निवेदन देताना श्री रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर, प्रणव पिंपळे, नितीन बिहारी, मयुर मेहता, बालाजी भेदोडकर, प्रणित महाकुलकर, नितीन भटगरे, तुषार घाटोळे, राजेंद्र सिडाम, प्रवीण पाठक, सुमित शिखरे उपस्थित होते.