वणी टाईम्स न्युज : आई वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित शेत विक्रीच्या व्यवहारातून कुटुंबात वाद उद्भवला. शेत विक्रीतून मिळालेली रकमेतून 10 हजार कमी दिल्याचा आरोप करुन लहान भाऊ व त्याची पत्नीने वाद घातला. वादाचा रूपांतर शिवीगाळ पर्यंत पोहचला आणि रागाच्या भरात लहान भावाच्या पत्नीने काडी मारुन भासऱ्याचा डोकं फोडला. सरकारी दवाखान्यात उपचारानंतर फिर्यादी भासऱ्याने लहान भाऊ आणि भावाच्या पत्नी विरुध्द मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
फिर्यादी राहुल सूर्यभान निमसटकर (50) हा मारेगाव तालुक्यात मार्डी येथे राहून शेती करतो. त्याच्या घराशेजारीच त्याचा लहान भाऊ प्रफुल सूर्यभान निमसटकर(45) हा कुटुंबासह वास्तव्यास आहे. तसेच त्याला दोन विवाहित बहिण आहे. फिर्यादी यांच्या आईवडिलांचे निधन झाले असून सर्वांच्या संमतीने वडिलोपार्जित 6 एकर शेती विकून मिळालेले पैसे चौघांनी समान वाटून घेतले.
दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री फिर्यादी राहुल निमसटकर हा घराकडे जात असताना लहान भाऊ व त्याची पत्नीने शेत विक्रीच्या रकमेतून तुम्ही आम्हाला 10 हजार कमी दिले असं म्हणून वाद घातला. दोघांमध्ये वाद व शिवीगाळ सुरु असताना लहान भावाची पत्नी अनुसया प्रफुल निमसटकर हिने बाजूला पडलेली काडी उचलून भासऱ्याच्या डोक्यावर मारुन डोकं फोडलं. तसेच जीवाने मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादी यांनी तक्रारीत नमूद केले. तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी प्रफुल निमसटकर व अनुसया निमसटकर दोघं रा. मार्डी विरुध्द कलम 118, 351(2), 351(3), 352 बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.