वणी टाईम्स न्युज : 23 डिसेंबर रोजी वणी नांदेपेरा मार्गावर रसोया फॅक्टरी जवळ दुचाकीला धडक देऊन पळवून नेलेली चारचाकी थार जीप पोलिसांनी जप्त केली आहे. या अपघातात दुचाकीवरील मागे बसलेली वरोरा तालुक्यातील शुभांगी वऱ्हाटे ही महिला ठार झाली तर दुचाकी चालक पती पुंडलिक वऱ्हाटे गंभीर जखमी झाला होता. फिर्यादी अरु विठ्ठल मिलमीले, रा. घोडपेठ, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर यांनी या घटनेची वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करुन तपास सूरु केला. घटनेचे प्रत्यक्षदर्शी यांचे बयान आणि सीसीटिव्ही फुटेज वरून एका भरधाव महिंद्रा थार या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याचे स्पष्ट झाले होते. अपघातास कारणीभूत थार वाहनाचा शोध घेत असताना गणेशपुर गावालगत एका वसाहतीत निर्माणाधीन घराच्या मागे लपवून ठेवलेली महिंद्रा थार जीप क्रमांक MH29 BV 3191 गाडी पोलिसांनी आढलून आली. तसेच थार गाडीचे समोरील डाव्या बाजूचे बंपर व मडगार्ड तुटून दिसून आले.
पोलिसांनी गाडीचे मालक बाबत माहिती काढली असता सदर थार गाडी छोरिया ले आऊट येथील मंगल खाडे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मंगल खाडे यांना विचारणा केली असता त्यांनी त्या दिवशी गाडी वॉशिंग करून आणण्यासाठी विशाल बदखल यास दिल्याचे सांगितले. परंतु विशाल बदखल यांनी नांदेपेरा मार्गावर एका बारमध्ये मद्य प्राशन करून नांदेपेरा मार्गावर भरधाव गाडी चालवत दुचाकीला जोरदार धडक देऊन अपघात घडविला.
पोलिसांनी लपवून ठेवलेली थार जीप जप्त करून कार चालक विशाल दशरथ बदखल,(29) रा. विद्या नगरी, वणी याला अटक केली. आरोपी विरुध्द 281,106(2) BNS सहकलम 134 (A)(B) मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहरानी यांचे मार्गदर्शनात पीएसआय धीरज गुल्हाने, हेड कॉन्स्टेबल विकास धडसे, शुभम सोनुले, मो. वसीम यांनी केली.