वणी टाईम्स न्युज : सार्वजनिक बांधकाम विभागाचे वणी येथील उप विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सैराट झाल्याचे पाहायला मिळत आहे. 9 डिसेंबर सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असताना दुपारी 11.30 वाजे पर्यंत बोरीकर नावाचा शिपाई वगळता सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयातून गैरहजर असल्याचे आढळले. मागील अनेक दिवसांपासून हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. वणी उप विभागात कोट्यावधी रुपयांचे रस्त्याचे कामे सुरु आहे. परंतु कामावर बांधकाम अधिकाऱ्यांचे व अधिकाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नसल्याची ओरड होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा अंतर्गत वणी येथे उप विभागीय कार्यालय आहे. वणी कार्यालयात उपअभियंता पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. त्याठिकाणी शाखा अभियंता सुरेश आसुटकर यांना प्रभार देण्यात आले. कार्यालयात 1 महिला कनिष्ठ अभियंत्यासह 4 कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), 1 स्थापत्य सहा. अभियंता, 1 वरिष्ठ लिपिक, 1 कनिष्ठ लिपिक, 1 शिपाई, 1 महिला शिपाई व 1 चौकीदाराची नेमणूक करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांपासून वणी बांधकाम कार्यालयाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. कार्यालयीन वेळेवर अधिकारी कर्मचारी हजर राहत नसल्याने कामासाठी आलेल्या अनेक नागरिकांना आल्यापावली परत जावं लागतं आहे. साहेब कुठे गेले अशी विचारणा केली तर साईडवर गेल्याचे सांगण्यात येते. मात्र चालु असलेल्या कोणत्याही कामावर उप अभियंता किंवा कनिष्ठ अभियंता प्रत्यक्षात हजर असल्याचे दिसत नाही. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकाम होत आहे. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उप विभागातील ठेकेदार शिरजोर झाले आहे.
कार्यालयात हजेरी रजिस्टरची व्यवस्थाच नाही
कोणतेही शासकीय, निम शासकीय कार्यालय, बँका व इतर खाजगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थितीचे रजिस्टर किंवा थंब मशीन ठेवण्यात येते. मात्र वणी येथील सार्व. बांधकाम कार्यालयात कोणतेही कर्मचारी कधीही या आणि कुठेही जा, याबाबत नोंदीची कोणतीही व्यवस्था असल्याचे आढळले नाही.
कनिष्ठ अभियंता हितेश राठी यांच्यासह नांदेपेरा मार्गावर सिमेंट रस्त्याचे नालीचे बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलो होतो. कार्यालयात कोण कोण अधिकारी, कर्मचारी आले याबाबत माहिती नाही.
सुरेश आसुटकर – प्रभारी उप अभियंता सा. बा. विभाग वणी
मागील 15 दिवसांपासून मी रजेवर आहे. त्यामुळे वणी कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती बाबत मला काही माहिती नाही.
शंतनु दुधाडे – कार्यकारी अभियंता, सा. बा. विभाग पांढरकवडा
वणी सा.बा. कार्यालयातील अभियंता, कर्मचाऱ्यांची उपस्थिती बाबत माहिती घेऊन योग्य कारवाई करणार.
चंद्रकांत मेहत्रे – अधीक्षक अभियंता, सा. बा. मण्डल यवतमाळ