वणी टाईम्स न्युज : राज्यात मागील 5 वर्षात वैचारिक व्याभिचाराचा खेळ चालला आहे. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढली आता त्यांच्याच बरोबर जाऊन बसले आहे. उध्दव ठाकरेंची सरकार असताना अजित पवारच्या मांडीला मांडी लावून बसणे आवडत नसल्याचे सांगून एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन भाजप बरोबर गेले. आणि आता तेच अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या मांडीवर बसले आहे. असा घणाघात राज ठाकरे यांनी यांनी केला आहे. ते मंगळवारी वणी विधानसभा मतदार संघात मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद ताब्यात घेतला. एवढंच नव्हे तर त्यांनी हनुमान चालीसा पठण करणाऱ्या 17 हजार मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. बाडगा मुसलमान जास्त नमाज पढतो असा घणाघात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. उध्दव ठाकरेच्या काळात मुंबईत काही ठिकाणी होर्डिंग्जवर हिंदू हृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नाव उर्दू भाषेत जनाब बाळासाहेब ठाकरे असे लिहिल्या गेल्याची खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
सत्ताधाऱ्यांनी जागोजागी तुमच्या मताचा अपमान केला असून अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. तेच ते शिळ्या चेहऱ्यांना निवडून देण्यापेक्षा एकदा राजू सारखा नवा चेहरा विधानसभेत पाठवा. मतदानाच्या दिवशी तुम्ही जिवंत रहा असा आवाहन राज ठाकरे यांनी मतदारांना केला. राज ठाकरे हे नियोजित वेळेपेक्षा 2 तास उशिरा मंचावर पोहचले. मात्र राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने महिला व पुरुष रात्री 9 वाजे पर्यंत मैदानात जमून होते.
यावेळी वणी विधानसभा मतदार संघातील उमेदवार राजू उंबरकरसह यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील मनसेचे उमेदवार गजानन वेरागडे, सागर दुधाने, ब्रिजराम किंजर, प्रवीण सुर, गणेश बरबडे, अश्विन जयस्वाल, संतोष चौधरी, संदीप कोरु, घनश्याम निखाडे, आदित्य दुरुगकर, सचिन भोयर, सुरेश चौधरी मंचावर उपस्थित होते. राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
भाजपवर टीका करणे टाळले
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेसह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुखयमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र त्यांनी केंद्रातील भाजप सरकार किंवा राज्यातील भारतीय जनता पक्षातील एकही नेत्याचा उल्लेख आपल्या भाषणात त्यांनी केलं नाही. पुत्र अमित ठाकरे यांच्या उमेदवारीवरून राज ठाकरे भाजप बाबत सॉफ्ट असल्याचे बोलले जाते.
नोकरीत परप्रांतीयांच्या मुद्दा
राज ठाकरे यांनी रेल्वेच्या भरतीमध्ये परप्रांतीयांना नोकरीचा मुद्दा उपस्थित केला. मनसेने रेल्वे विभागाला नोकरी संदर्भात जाहिरात मराठी वृत्तमान पत्रात देण्यास भाग पाडले. आणि त्यामुळे मराठी माणसांना रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळाल्या. असे राज ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.