वणी टाईम्स न्युज : विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराने गळा आवळून खून केल्याची घटना मारेगाव येथे घडली. खून केल्यानंतर मृत युवकाने आत्महत्या केल्याचा बनाव आरोपीने रचला. मात्र पोलिसांनी काही तासातच आरोपी प्रियकर व त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या. भीमराव तुकाराम मडावी (31) रा. बाबईपोड, ता. मारेगाव असे खून झालेल्याचे नाव आहे. तर जमदार उर्फ संतोष पडोळे व गोलू पुसदेकर रा. कूंभा असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबईपोड येथील भीमराव तुकाराम मडावी व कुंभा येथील जमदार उर्फ संतोष पडोळे यांची शेती लागून आहे. शेतात काम करीत असताना भीमरावच्या पत्नीचे संतोष पडोळे सोबत प्रेम संबंध निर्माण झाले. भीमराव घरी नसताना संतोष अनेकवेळा त्याच्या घरी येत होता. पत्नीचे जमदार सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती झाल्यावर पती पत्नीचे जोरदार भांडण झाले. त्यामुळे भीमरावची पत्नी 3-4 दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली.
गुरुवार 24 ऑक्टोबर. रोजी भीमराव गावातून 2 किमी अंतरावर कुंभा येथे गेला होता. कुंभा येथे पत्नीचे प्रियकर संतोष पडोळे सोबत भीमराव याचा जोरदार वाद झाला. त्यानंतर भीमराव सायंकाळी दारूच्या नशेत पायदळ गावाकडे निघाला. दरम्यान आरोपी जमदार हा आपल्या मित्रासह रात्रीच्या वेळी प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या माहेरच्या गावाकडे निघाला असता कुंभा बोटोणी मार्गावर त्याला दारूच्या नशेत भीमराव दिसून पडला.
प्रेयसी सोबत संबंधात तिचा पती अडसर ठरत असल्याचा राग जमदराच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी डाव साधून रात्रीच्या अंधारात ओढणीच्या सहाय्याने भीमरावचा गळा आवळून खून केला. त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र गोलूच्या मदतीने मृतदेह उचलून भीमराव यांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला. दुसऱ्या दिवशी घटना उघडकीस आल्यानंतर उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात पोलिसांनी तपासचक्र फिरवून कुंभा येथून आरोपी प्रियकर व त्याच्या मित्राला अटक केली. पोलीस तपासात सुरुवातीमध्ये दोघांनी तो मी नव्हेच ची भूमिका घेतली. परंतु पोलिसांनी बाजीरावचा प्रसाद देताच दोघांनी भीमरावची हत्या करण्याचे कबूल केले. हत्येच्या या घटनेत मृतक भीमरावच्या पत्नीचाही सहभाग आहे का ? पोलीस या दिशेनेही बारकाईने तपास करीत आहे.