जितेंद्र कोठारी, वणी : शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पुरड (नेरड) गावात एका तरुण शेतकऱ्यांनी कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजता दरम्यान घडली. प्रवीण उर्फ सोनू दिलीप खारकर (28) असे मृतक तरुणाचा नाव आहे. मृतक तरुण हा अविवाहित असून आपल्या आईसोबत राहत होता.
मृतकाचे काका यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनु सकाळी 9 वाजता त्याच्या आईला शेतात जातो म्हणून घरून निघाला. त्यानंतर अंदाजे 10 वाजता तो घरी आला व खाटेवर झोपून गेला. आईने आवाज दिला असता तो उठला नाही. तेव्हा त्याच्या आईने शेजारी राहणारे सोनुच्या काकाला बोलाविले. सोनूच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून त्यांना तात्काळ त्याला ऑटोमध्ये कायर येथील प्राथ. रुग्णालयात आणि नंतर वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृतक प्रवीण (सोनू) चे वडील मरण पावले असून त्याचा मोठा भाऊ वेगळा राहतो. प्रवीण हा हैद्राबाद येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करीत होता. मात्र वडिलांच्या निधनानंतर तो नोकरी सोडून गावातच राहून शेती सांभाळत होता. विधवा आईचा आधार असलेल्या सोनु खारकर यांनी आत्महत्या केल्यानी आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनू यांनी आत्महत्या का केली ? याबाबत कुटुंबीय सुद्धा अनभिज्ञ आहे.
सहा तासापासून मृतदेह पोस्टमार्टमच्या प्रतीक्षेत
सोनू उर्फ प्रवीण खारकर याचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांनी दुपारी 2 वाजता वणी ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र सायंकाळी 6 वाजेपर्यंत मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी एकही पोलीस कर्मचारी ग्रामीण रुग्णालयात पोहचला नाही. पंचनामा कारवाई अभावी मृतदेहाची पोस्टमार्टम प्रक्रिया रखडली. मृतकाचे कुटुंबीयांनी तीन वेळा पोलीस स्टेशनला जाऊन लवकर पंचनामा करण्याची विनंती केली. परंतु पोलीस कर्मचारी दुसऱ्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगून रात्री 7 वाजेपर्यंत पंचनामा व पोस्टमार्टम झाला नव्हता.