वणी टाईम्स न्युज : वणी तालुक्यातील सर्व रेतीघाट बंद असताना मात्र चोरट्या मार्गाने रेती उत्खनन व वाहतूक बिनधास्त सूरु आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी भरदुपारी रेती वाहतूक करताना एक मिनी ट्रक उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकाने पकडले. भालर रोड एमआयडीसी परिसरात केलेल्या या कार्यवाहीत पोलिसांनी टाटा 909 मालवाहू ट्रक क्रमांक MH29 T 1916 मध्ये भरलेली अंदाजे दीड ब्रास रेती व वाहन जप्त केला.
पोलिसांनी वाहन चालक परमेश्वर बबनराव वरारकर (39), रा. रंगारीपुरा वणी यास रेती वाहतूक परवाना व रॉयल्टी बाबत विचारणा केली असता त्याच्याजवळ कोणतेही कागदपत्र मिळाले नाही. चालकाने एम्आयडीसी येथे संतकृपा सिमेंट उद्योग याठिकाणी रेती स्टॉक करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली. फिर्यादी पोलीस हवालदार इकबाल उस्मान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहन चालक परमेश्वर बबनराव वरारकर विरुद्ध कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
रेती तस्करीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष
शहरात तसेच ग्रामीण भागात रात्रंदिवस रेतीची चोरटी वाहतूक सूरु आहे. रेती चोरी व वाहतुकीवर आळा घालण्याचा कर्तव्य महसूल विभागाचा आहे. परंतु कुंपणच शेत खाते उक्ती प्रमाणे महसूल खात्याने रेती तस्करांना खुली छूट दिल्याचे दिसत आहे. शहरात छत्तीसगड व गुजरात बॉर्डर येथून मोठ्या प्रमाणात रेती येत आहे. मात्र रेतीची वैध रॉयल्टी व वाहतूक परवाना आहे की नाही ? याची साधी तपासणी करण्याची गरज महसूल अधिकाऱ्यांना वाटत नाही.
रेती तस्करीला वाहन मालक आरोपी नाही का ?
रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणात महसूल व पोलीस विभागाकडून फक्त वाहन चालकाची आरोपी म्हणून नोंद करण्यात येते. वास्तविक पाहता वाहन चालक फक्त एक पगारदार कामगार म्हणून मालकाच्या आदेशाचा पालन करीत असतो. रेती उत्खनन व वाहतूक कायदेशीर आहे की अवैध आहे, या बाबीशी त्याचा संबंध नसतो. रेती तस्करी करणारा खरा आरोपी त्या वाहनाचा मालक असताना FIR मध्ये वाहन मालकाचा उल्लेखच नसतो.