वणी टाईम्स न्युज : येथील साई मंदिर ते नांदेपेरा रोड रेल्वे क्रॉसिंग पर्यंत चार पदरी सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र सदर राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण असल्यामुळे रस्त्याचे बांधकाम संथगतीने होत आहे. अतिक्रमण धारकांना आपले अतिक्रमण काढण्यासाठी अनेकदा मौखिक विनंती करूनही अतिक्रमण काढण्यात आले नाही. शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी नांदेपेरा मार्गाच्या दोन्ही बाजूने असलेले घर, दुकान मालकांना लेखी नोटीस बजावली. या नोटीस मध्ये पुढील 7 दिवसात रस्त्याच्या मध्यपासून 12 मीटरचे आत असलेले आपले कच्चे, पक्के अतिक्रमण स्वतः हुन काढून सहकार्य करण्याचे आवाहन केला आहे.
मुंबई महामार्ग कायदा 1955 ला अनुसरून कार्यकारी अभियंता, सार्व. बांधकाम विभाग पांढरकवडा यांच्या सहिनिशी सदर नोटीस बजावण्यात आले आहे. अतिक्रमण काढण्यासाठी हे अंतिम नोटीस समजून सात दिवसात अतिक्रमण न काढल्यास इतर कुठलीही सूचना न देता अतिक्रमण तोडण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी लागणारा खर्च अतिक्रमण धारकाकडून वसूल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उल्लेखनीय आहे की, वडकी, खैरी, मार्डी, नांदेपेरा ते वणी रस्ता की.मी.180/800 ते 182/500 (साई मंदिर ते रेल्वे क्रॉसिंग) पर्यंत चौपदरी सिमेंट रोड, डिव्हायडर व नालीचे बांधकाम सुरू आहे. परंतु रस्त्याच्या हद्दीत काही ठिकाणी 2 ते 3 मजली इमारती तर काही ठिकाणी अतिक्रमण करुन वॉल कंपाऊंड असल्यामुळे नालीचे सरळ न बांधता आडवी तिडवी बांधण्यात येत आहे.
अतिक्रमणामुळे नाली बांधकामात अनियमितता होत असल्या बाबत वणी टाईम्सने 2 ऑक्टोबर रोजी बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर एका समाजसेवकाने बांधकाम विभागाला लेखी तक्रार व माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितली. अखेर बांधकाम विभागाने शुक्रवारी सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली. आता तरी या मार्गाचे काम व्यवस्थीत आणि चांगल्या दर्जाचे होईल, अशी अपेक्षा या भागातील नागरिकांची आहे.