वणी टाईम्स न्युज : दुचाकी वाहनावरील दंडाची रक्कम आपल्या स्वतच्या फोन पे वर घेणे महिला पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच भोवले. सदर प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी वणी पोलीस ठाण्यातील महिला सहा.फौजदार हिला निलंबित केले आहे. ASI स्वाती दादाराव कुटे बक्कल नंबर 56 असे या निलंबित महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारकर्ता आदर्श संजय गुरफुडे, रा. इंदिरा चौक वणी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना तक्रार दिली होती की, दिनांक 26 सप्टेंबर रोजी शाम टॉकीज परिसरात पोलीस कर्मचारी सागर सिडाम यांनी त्याची मोटरसायकल पकडुन वणी पोलीस स्टेशन मध्ये आणली. गाडीचा चालान करायचं आहे म्हणून महिला एएसआय स्वाती कुटे हिने आदर्श गुरफुडे याला तिच्या फोन पे वर एक हजार रुपये मारायला लावले. त्यानंतर वाहतूक पोलिसांना बोलावून पाचशे रुपयाची चालान फाडली. मात्र उर्वरित पाचशे रुपये तिनं परत दिले नाही. तक्रारकर्त्यानी पाचशे रुपये परत मागितले असता महिला कर्मचारी स्वाती कुटे हिने त्याला जास्त शहाणपणा करू नका, चल निघ येथून, असे दम दिला.
घडलेल्या घटनेबाबत फिर्यादी आदर्श संजय गुरफुडे यांनी 30 सप्टेंबर रोजी रजिस्टर पोस्ट द्वारे जिला पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना तक्रार पाठविली. सोबतच स्वाती कुटे हीच्या फोनपे वर एक हजार रुपये पाठविल्याचे स्क्रीन शॉट व वाहतूक पोलिसांनी फाडलेल्या चलानाची प्रत त्यांनी पाठविली. तक्रारीची शहानिशा करून जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी शनिवार 12 ऑक्टोबर रोजी सदर महिला पोलिस कर्मचारी स्वाती कुटे हिला निलंबित केले.
मटका जुगार व्यावसायिका सोबत संबंध असलेले वणी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन होऊन आठवडा झाला नाही तर सहा.उप निरीक्षक पदावरील महिला पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. एका आठवड्यात तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे वणी पोलीस ठाण्याचे पितळ उघडे पडले आहे.