वणी टाईम्स न्युज : या वर्षी दि.3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या जैताई नवरात्र महोत्सवात भक्तीरसपूर्ण कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. 3 ऑक्टोबर रोजी श्रीपाद सेवा भजन मंडळाचे भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरचे शाम धुमकेकर यांचे कीर्तन 4 ऑक्टोबरला जनार्दन लाडसे व संच यांच्या सुगम संगीताचा कार्यक्रम 5 ऑक्टो. रोजी तर दि.6 ऑक्टो. रविवार रोजी मुंबई येथील विख्यात व्याख्यात्या अपर्णा बेडेकर आपल्या ‘तिनेच गगन झेलियेले ‘या विषयावरील व्याख्यानातून मुक्ताबाई, जनाबाई, कान्होपात्रा, वेणास्वामी आणि बहिणाबाई या महाराष्ट्राच्या देदीप्यमान पंचकन्यांच्या प्रेरक कर्तृत्वाचा आढावा घेणार आहे.
दि.7 ऑक्टोबर रोजी संस्कार भारती व सागर झेप बहुउद्देशीय संस्था प्रस्तुत देवीचा गोंधळ, जोगवा व इतर नृत्यांचा कार्यक्रम सादर केले जाईल. दि.8 ऑक्टोबर मंगळवार रोजी मंदिराचा प्रतिष्ठाप्राप्त जैताई मातृगौरव पुरस्कार अध्यात्माच्या माध्यमातून समाजसेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या प.पू. सद्गुरू शिरीषदादा कवडे, पुणे ह्यांना विद्यावाचस्पती प्रा स्वानंद पुंड यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. विदर्भ साहित्य संघाच्या स्थानिक शाखा व नगर वाचनालयाच्या वतीने बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी नागपूर येथील कवि मधुकर सवरंपते यांच्या ‘ स्मृतिगंध ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. डाॅ. दिलीप अलोणे यांच्या हस्ते व विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. दि.10 ऑक्टोबर गुरुवारला नागपूर येथील नामवंत गायक निरंजन बोबडे 50 कलावंतांनी नटलेला एक अपूर्व ,नेत्रदीपक व कर्णमधुर भक्तीरसपूर्ण कार्यक्रम ‘ भक्तीस्वराभिषेक ‘ सादर करणार आहे. दि.11 ला जैताई भजन मंडळाचे भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हे सर्व कार्यक्रम रोज रात्री ८ वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात संपन्न होणार आहेत. याशिवाय 3 ते 11 ऑक्टोबर पर्यंत रोज सकाळी 7.30 ते 10.30 पर्यंत स्त्रियांच्या आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन श्री विश्वयोग आयुर्वेदिक व पंचकर्म उपचार केंद्र वणीच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरात प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व नाडी परीक्षण तज्ञ सुवर्णा सोनाली चरपे ह्या रुग्ण तपासणी करतील. नवरात्रातील या सर्व कार्यक्रमांचा लाभ बंधु भगिनींनी बहुसंख्येने घ्यावा अशी विनंती आयोजक संस्थेने केली आहे.