वणी टाईम्स न्युज : महाविकास आघाडीतर्फे वणी विधानसभेची सीट शिवसेना (उबाठा) गटासाठी सोडण्यात आल्याची खमंग चर्चा शुक्रवारी शहरात पसरली होती. मात्र कांग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी सदर चर्चेचा खंडन केला आहे. वणीच्या जागे बाबत महाविकास आघाडीत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती वामनराव कासावार यांनी दिली.
वणी टाईम्स सोबत बोलताना माजी आमदार वामनराव कासावर यांनी सांगितले की चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात शिवसेना (उबाठा) बल्लारपुर आणि वणी या दोन जागासाठी आग्रही आहे. परंतु वणी विधानसभेसाठी आम्ही दावा सोडलेला नाही. वणी हा आमचा बालेकिल्ला आहे आणि ही बाब आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीना कळविली आहे. राज्यात सीट वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये अद्याप फॉर्म्युला ठरला नाही. त्यामुळे वणीची जागा शिवसेना (उबाठा) ला मिळेल की काँग्रेस पक्षाला हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. असे वामनराव कासावार यांनी सांगितले.
वणी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) तर्फे निवडणूक लढण्यास अनेक जण बाशिंग बांधून आहे. काँग्रेस पक्षात माजी आमदार वामनराव कासावारसह संजय खाडे, टीकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे तर शिवसेना (उबाठा) कडून माजी आमदार विश्वास नांदेकर, संजय निखाडे, संजय देरकर किंवा त्यांची पत्नी किरण देरकर आमदार होण्यास इच्छुक आहे.