वणी टाईम्स न्युज : वणी उप विभागात मुरुम या गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन करून विक्री करणारे रॅकेट सक्रिय आहे. मागील काही वर्षापासून ई क्लास, वनविभाग तसेच खाजगी जमिनीतून विना परवाना मुरुम उत्खनन करून तस्करी करण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे. यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा ह्रास होत आहे, शिवाय शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडत आहे. त्यामुळे अवैध मुरुम उत्खनन व वाहतूक तात्काळ थांबवा. अशी मागणी संभाजी ब्रिगेड तर्फे उप विभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.
तालुक्यातील मोहदा, रासा, वांजरी वागदरा (नविन) अश्या ठिकाणी मुरुमाचे सर्रास उत्खनन सुरु आहे. याबाबत संभाजी ब्रिगेड व परिसरातील नागरिकांनी संबंधीत विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु सबंधीत अधिकारी व कर्मचारी कार्यवाही करण्याऐवजी अवैध उत्खनन व वाहतुक करणाऱ्या तस्कराना पाठबळ देताना दिसत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा नुकसान होत आहे. असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.
या सर्व प्रकाराला महसुल, आर.टी.ओ., वाहतुक व पोलीस प्रशासनाचा मोठा वरदहस्त लाभला आहे. या तस्करीतून मिळणाऱ्या पैशातील काही हिस्सा सबंधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या खिशात जातो. यामुळे संबधीत विभागात कोणी लेखी किंवा मौखिक तक्रार केल्यास तात्पुरती कार्यवाही करून हजारो ब्रास अवैद्य मुरूमाचे उत्खनन आढळून आल्यास केवळ २५ ते ५० ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे आढळून आल्याची नोंद केल्या जाते. ही थातुरमातूर कार्यवाही न करता सदर उत्खननाचे निरीक्षण जबाबदार आधिकारी व गावातील लोकप्रतिनीधी समक्ष इ.टी.एस. मशिनद्वारे मोजमाप व मुल्याकंन करून, महाराष्ट्र जमिन महसुल संहिता 1966 कलम 48 (7) नुसार, गौनखणिजाचा बाजार मुल्याच्या 5 पट दंड आकारण्यात यावा. तसेच कलम 48 (8) नुसार अवैध उत्खननासाठी वापरलेली यंत्र सामुग्री जप्त करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
अवैध उत्खननाला पाठबळ देणाऱ्या अधीकारी व कर्मच्याऱ्यांवर योग्य ती कारवाही करावी. अन्यथा येणाऱ्या आठ दिवसात संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, ऍड.अमोल टोंगे, खलीलभाई शेख, दत्ता डोहे, आशिष रिंगोले उपस्थित होते.