वणी टाईम्स न्युज : बदलापूर येथील चिमुकलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. त्याआधी कोलकाता येथील एका महिला डॉक्टर व उत्तराखंड येथील एका नर्सवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा काँग्रेसतर्फे निवेदन देत निषेध करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी केली. बुधवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात शहर काँग्रेस व काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष संध्या बोबडे यांच्या नेतृत्त्वात महिला काँग्रेसने उप विभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा असे मानून डॉक्टर आणि नर्स आपली रुग्णसेवा देतात. दिवस असो किंवा रात्र वैद्यकीय सेवा 24 तास सुरु असते. मात्र सध्या देशात महिला डॉक्टर किंवा नर्स यांच्याबाबत होणा-या हिंसाचा-याच्या घटना मन हेलावून टाकतात. पालक आपल्या मुलामुलींना शाळेत पाठवतात. मात्र तिथे देखील मुली सुरक्षीत नाहीत. अनेक शाळेत सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलींना शाळेत पाठवावे कसे? असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
यापुढे महिला व विद्यार्थीनींवर कोणतेही अत्याचार होऊ नयेत, त्यांना सुरक्षीतता मिळावी, गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा तसेच या नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. 24 ऑगस्ट रोजी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंद मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.
निवेदन देते वेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम पावडे, अशोक पांडे, जयसिंग गोहोकार, राकेश खुराणा, ओम ठाकूर, रवि कुंड्रावार, सुधीर खंडाळकर, बोबडे सर, रवी देठे, ऍड. रुपेश ठाकरे, तर महिला काँग्रेसतर्फे मंगला झिलपे, विजया आगबत्तलवार, अलका महाकुलकर, सविता रासेकर, दर्शना पाटील, जयवंत घोडाम, कल्पना मडावी, प्रिया मडावी, कमल पावडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.