वणी टाईम्स न्युज : विधानसभा निवडणूकीच्या ऐन तोंडावर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक शिवसेना (उबाठा) मध्ये उभी फाड पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख व माजी आमदार विश्वास नांदेकर आणि वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्यामध्ये मतभेद चव्हाट्यावर पोहचले आहे. बुधवार 7 ऑगस्ट रोजी विश्वास नांदेकर यांनी विधानसभा संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर यांच्या उपस्थितीत वणी येथे पत्रकार परिषद घेऊन संजय देरकर हे वरिष्ठांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप लावला. तसेच शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख गायकवाड हे देरकर यांना हाताशी धरून गटबाजी निर्माण करीत असल्याचा घणाघात केला.
माजी आमदार विश्वास नांदेकर शिवसेनेचे एकनिष्ठ नेते असून ते शिवसेना (उबाठा)चे यवतमाळ जिल्हा प्रमुख आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ काढून मनगटात शिवबंधन बांधणारे संजय देरकर यांना वणी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. मागील काही दिवसांपासून संजय देरकर यांनी वणी विधानसभेत विविध कार्यक्रम राबवून शिवसेनेत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांची नेमणूक करण्याचा अधिकार केवळ जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख व शहर प्रमुख यांनाच आहे. असे असताना संजय देरकर यांनी पक्ष नियम तोडून अवैधरीत्या नेमणुका केल्याचा आरोप नांदेकर यांनी केला. संजय देरकर यांनी 6 ऑगस्ट वणी येथील टागोर चौक येथे शाखा फलकाचे अनावरण केले. मात्र या फलकावर दोन्ही उपजिल्हा प्रमुखाचे नाव टाकण्यात आले नाही. झरी तालुक्यातील माथार्जून येथे आधीच शिवसेनेची शाखा असताना संजय देरकर यांनी दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन नवीन शाखा स्थापन केली.
शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रमुख चौकावर लावलेले शुभेच्छा बॅनरवरून वणी विधानसभा शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून पडले. नुकतेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट भगवा सप्ताह म्हणून आयोजित करण्यात येत आहे. मात्र संजय देरकर व विश्वास नांदेकर दोन्ही गट वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे.
कुटुंबात मतभेद..! मग पत्रकार परिषद का ?
विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर पक्षात अंतर्गत कलह हा घातक ठरणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर विधानसभा संपर्क प्रमुख विजयानंद पेडणेकर यांनी शिवसेना एक कुटुंब असून कुटुंबात मतभेद सुरूच असते. निवडणुकीत सर्व एकमेकांना सहकार्य करणार, असे उत्तर दिले. मग कुटुंबातील मतभेद पत्रकारांच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यामागे जिल्हा प्रमुखाचा उद्देश्य काय ? असा प्रश्न पत्रकारांना पडला.
संजय देरकर यांना पाठबळ कुणाचा ?
संजय देरकर यांनी काही काळापूर्वीच शिवसेनेत प्रवेश घेतला असता त्यांना विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच विधानसभा संपर्क प्रमुख यांना डावलून आपल्या मर्जीने कारभार चालविण्याचा धाडस देरकर कुणाच्या इशारावर करीत आहे. पक्षातील कुणीतरी वरिष्ठ नेत्यांचा त्यांना पाठबळ असल्याचे बोलले जाते. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देण्याचे वचन वरिष्ठांकडून मिळाले काय ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.