वणी टाईम्स न्युज : मारेगाव तालुक्यातील बोटोणी जंगल परिसरात एक पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळुन आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या चौकीदाराला मारोती मंदिराजवळ असलेल्या नाल्याशेजारी वाघाचा मृतदेह दिसून पडला. मृत वाघ आढळल्याची माहिती मिळताच पांढरकवडा वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.
मृत वाघाच्या मानेवर खोल जखम असून अती रक्तस्त्रावमुळे अंदाजे दोन दिवसांपूर्वी मृत्यु झाल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. तसेच शेतातील तारांच्या कुंपणात अडकून मानेवर जखम झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाघाच्या मृतदेहातून दुर्गंध सुटली असून वन विभागाकडून त्याच्या मृतदेहाचे जागीच शव विच्छेदन करण्यात आले. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत वनविभाग अधिक चौकशी करणार आहेत.