वणी टाईम्स न्युज : पती-पत्नीमध्ये वाद होणे ही एक सामान्य गोष्ट आहे कारण जेथे प्रेम असते तेथे वादही अवश्य असतात. परंतु कधीकधी हे वाद गरजेपेक्षा जास्त वाढून पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन पोहचतात. कौटुंबिक व वैयक्तिक कारणांमुळे तर अनेक जोडप्यांमध्ये वाद होतात. पण हल्ली नवरा बायकोचा सुखी संसारात मोबाईल फोन हा खलनायक म्हणून उदयास आल्याचे सकृतदर्शनी जाणवत आहे.
पूर्वी संयुक्त कुटुंब व्यवस्था असल्याने नवरा बायकोचे भांडण झाल्यास कुटुंबातील वरिष्ठ नातेवाईक त्यांची समजूत काढून भांडण संपुष्टात आणायचे. मात्र आता एकल कुटुंब असल्यामुळे लहान मोठ्या गोष्टीवर पती पत्नीमध्ये वाद होऊन त्याला कायद्याचा चौकटीत आणण्याचा निर्णय घेतला जाते. नवरा बायकोचे आपसी वादाची तक्रार मिळाल्यास पोलीस थेट गुन्हा दाखल न करता प्रकरण महिला समुपदेशन कक्षाकडे वर्ग करतात. महिला समुपदेशन कक्ष (भरोसा सेल) मध्ये पती पत्नी दोघांची काउंसलिंग करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो.
भरोसा सेलमध्ये झालेले वाद विसरून नव्याने वैवाहिक जीवन सुरु करण्यासाठी दोघाना तीन वेळा संधी दिली जाते. त्यानंतर महिलाच्या तक्रारीवर गैरअर्जदारवर पोलीस गुन्हा दाखल करतात. गेल्या 6 महिन्यात वणी पोलीस ठाण्यातून नवरा बायकोचे भांडणाचे 37 प्रकरण महिला समुपदेशन केंद्र पांढरकवडा येथे पाठविण्यात आले. त्यात काही प्रकरणाचा निपटारा करण्यात आला तर काही प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले.
सुखी संसारात मोबाईलचा खोडा ..!
एकमेकांच्या जवळ जाण्याचं साधन म्हणून मोबाईलकडे पाहिलं जातं. दिवसेंदिवस मोबाईलची आपल्या खासगी आयुष्यातील लुडबुड वाढत आहे. मोबाईल आणि सोशल मीडियामुळं नात्यांमध्ये तेढ निर्माण होतेय. पती पत्नीच्या सुखी संसारावरही याचा परिणाम पाहायला मिळतोय. रात्री उशिरा पर्यंत मोबाईलवर चॅटिंगच्या सवयीमुळे एकमेकांवर संशय घेण्याचे प्रमाण वाढले आहे. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात. पण हल्ली मनुष्यानेच तयार केलेलं एक साधन म्हणजेच मोबाईल या गाठी तोडण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचा दिसतोय.