वणी : शहरालगत असलेल्या एका पाश कॉलोनीत वास्तव्यास विवाहित महिलेच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरुद्द वणी पोलीस ठाण्यात हुंड्याविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैश्यासाठी विवाहित युवतीचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पती, सासू, सासरे व विवाहित नणंद हिला आरोपी नमूद करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार युवतीचे लग्न जून 2022 मध्ये सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. लग्नानंतर काही दिवस पती व सासरच्या लोकांनी तिला चांगली वागणूक दिली. मात्र काही महिन्यानंतर तिचा पती दारूच्या नशेत वाद करून तिला मारहाण करायचा. तसेच तिची सासू व सासऱ्यांनी मुलाला दुकान लावून देण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणण्यासाठी तिचा मानसिक छळ सुरु केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सासरच्या लोकांच्या मागणीवरून महिलेने आपल्या आईकडून 3 लाख रुपये आणून दिले. मात्र उर्वरित 2 लाख आणण्यासाठी सासू सासरे तिला मारहाण करायचे. तसेच नागपूर येथे वास्तव्यास असलेली तिची विवाहित नणंद तिला वडिलांच्या जीवावर आयता खाते, काही काम करत नाही असे म्हणून नेहमी तिचा मानसिक छळ करायची. दिनांक 30 डिसेंबर रोजी सासऱ्याने तिच्या मोठ्या वडिलांना फोन करून तुमची मुलीची तब्येत खराब आहे तिला येथून घेऊन जा, असे निरोप दिले. त्यानंतर ती आई आणि मोठ्या वडिलांसोबत माहेरी आली. मागील 3 महिन्यात तक्रारदार विवाहित महिला अनेकदा सासरी नांदवयास गेली असता तिला घरात येऊ दिला नाही.
अखेर पिडीत महिलेनी आपल्या आई सोबत 17 मार्च रोजी वणी पोलीस ठाणे गाठून पती, सासू, सासरे व नणंद विरुद्ध हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ व मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी सासरच्या मंडळी विरुद्ध कलम 498 (अ) व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.