वणी : घर बांधकाम मजुरीवर जाताना वडिलांनी आपल्या 8 वर्षाच्या मुलीला आत्याच्या घरी सोडले. मात्र आत्याच्या घरून सकाळी 7 वाजता दरम्यान शौच करण्यासाठी कोलगाव रस्त्याकडे गेलेली मुलगी बेपत्ता झाली. सदर घटना मारेगाव येथे 12 मार्च रोजी उघडकीस आली. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी हा 12 मार्च रोजी सकाळी घर बांधकाम मजुरी कामावर जाताना आपल्या 8 वर्षाच्या मुलीला आत्याच्या घरी सोडून गेला. दुपारी 11 वाजता फिर्यादी कामावरून परत आला असता आत्यानी तुझी मुलगी सकाळी 7 वाजता संडासला गेली तर परत आलीच नसल्याचे सांगितले. वडिलांनी व नातेवाईकांनी वस्तीत व कोलगाव रस्त्यावर शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही.
अखेर फिर्यादी यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन कुणीतरी अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मारेगाव ठाण्यात नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल करुन मुलीचा शोध घेणे सुरू केले आहे.