वणी : दहावीची परीक्षा द्यायला गेलेली अल्पवयीन मुलगी परीक्षा केंद्रातून बेपत्ता झाली. शोध घेऊन ही मुलगी मिळून न आल्याने नातेवाईकांनी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
प्राप्त माहितीनुसार झरी तालूक्यातील मुलगी आपल्या मावशीकडे वणी येथे राहून शिक्षण घेत होती. सद्य दहावीचे बोर्डाचे पेपर सुरु असून गुरुवार 7 मार्च रोजी इंग्रजीचा पेपर होता. त्यामुळे तिच्या मावशीच्या मुलाने तिला मोटरसायकलवर परीक्षा केंद्राबाहेर सोडले. दुपारी 12 वाजता दरम्यान तिच्या शाळेतील एका शिक्षकाने घरी फोन करून मुलगी इंग्रजीच्या पेपरला गैरहजर असल्याची माहिती दिली. तेव्हा फिर्यादीच्या मुलाने परीक्षा केंद्रावर जाऊन चौकशी केली असता सदर मुलगी पेपर द्यायला आलीच नसल्याचे समजले.
बेपत्ता मुलीच्या मावशी व कुटुंबीयांनी वणी शहर व तिच्या मैत्रिणीकडे शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे फिर्यादी मावशीने तिची 14 वर्ष 7 महिन्याची अल्पवयीन भाचीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनला दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
दीपक चौपाटी येथून दुचाकी लंपास
रस्त्यावर दुचाकी उभी करून मटण आणायला गेलेल्या तरुणाची होंडा CB unicorn मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. शहरातील दीपक टाकीज चौकात ही घटना बुधवार 6 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान घडली. याबाबत फिर्यादी पवन देविदास खिरटकार (33) रा. निवली ता. वणी यांनी वणी पो.स्टे. मध्ये तक्रार नोंदविली आहे.
तरुणाकडून धारदार तलवार जप्त
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील राजूर (इजारा) येथील एका घरावर रेड करू वणी पोलिसांनी धारदार लोखंडी तलवार जप्त केली आहे. सुमित भास्कर खोके (24) रा. राजूर (इजारा ) असे अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्द भारतीय शस्त्र अधिनियम कलम 25, 4 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ट्रकच्या धडकेत ऑटोचालक ठार
कोळसा वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने ऑटोला समोरून धडक दिल्याने ऑटो चालक जागीच ठार झाला. यवतमाळ मार्गावर पळसोनी फाट्याजवळ रविवार 10 मार्च रोजी रात्री 9.45 वाजता दरम्यान ही घटना घडली. रामखिलावन बसई प्रसाद (34) रा. राजूर असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ऑटो चालकाचे नाव आहे. पोलिसांनी ट्रक क्रमांक MH 34 AB 9523 च्या चालकाविरुद गुन्हा दाखल केला आहे.
अवैधरित्या विक्रीसाठी दारू नेताना इसमास अटक
विना परवाना अवैधरित्या विक्रीसाठी देशी दारू नेताना एका व्यक्तीला वणी पोलिसांनी घोंसा चौफुली येथे अटक केली. विजय दौलत झाडे (37) रा. दरा साखरा, ता. वणी असे आरोपी युवकाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून रुपेश संत्रा ब्रांड देशी दारूचे 180 मिलीचे 24 पव्वे किमत 1 हजार 668 रुपये जप्त करून आरोपीला अटक केली. आरोपिविरुद्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.